नाशिक : राज्यात मुख्यमंत्री पदावरून सत्तासंघर्ष सुरु असतानाच नाशिकमध्ये महापौर पदावरुन शिवसेना भाजपच्या मार्गात अडसर निर्माण करण्याची शक्यता आहे. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना शिवसेनेत प्रवेश देऊन शिवसेनेन आपले इरादे स्पष्ट केलेत.भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी 23 दिवसांच्या घरोब्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देवून शिवबंधन बांधल आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारल्यानंतर बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवून भाजपला आव्हान दिलं होतं. युतीचा उमेदवार असतानाही शिवसेना नेते संजय राऊत यांनी बाळसाहेब सानप यांची भेट घेऊन राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. मात्र निवडणुकीत सानप यांना पराभवाचे धनी व्हावे लागले. नाशिक महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता येण्यात बाळासाहेब सानप यांचा मोलाचा वाटा होता. भाजपचे 66 नगरसेवक निवडून आले होते. या यशात सानप यांच्या मुलासह समर्थकांचाही समावेश होता. विधानसभा निवडणुकीत सानप यांच्या समर्थकांनी पक्षविरोधी काम केल्याने त्याचा अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठविण्यात आला आहे.

नाशिक महानगरपालिकेत भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर भाजपचे सध्या 65 तर शिवसेनेचे 34 नगरसेवक आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीचे प्रत्येकी 6, मनसेचे 5, अपक्ष 3 आणि आरपीआय आठवले गटाचा 1 नगरसेवक असे मनपातील पक्षीय बलाबल आहे. सध्या शिवसेनेकडे विरोधीपक्षनेतेपद आहे. बाळासाहेब सानप यांचा शिवसेना प्रवेश झाल्यान त्यांच्या समर्थक नगरसेवकांच्या जोरावर महापौरपद मिळविण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे त्यासाठी विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. एक महिनाच्या अंतराने नाशिक महापालिकेत महापौर उपमहापौर पदाची निवडणूक होणार असून आकडेमोड करण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.



महापालिकेवर भगवा फडकविण्याचे शिवसेनेचे स्वप्न आहे. राजकारणात काही होऊ शकते असा दावा शिवसेनेकडून केला जात असला तरी देखील कॉंग्रेस राष्ट्रवादी आणि मनसे शिवसेनेला पाठींबा देतील का? हे आगामी काळात पाहणं महत्त्वाचं असणार आहे.