कोल्हापूर:  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कल्याणमध्ये उभारण्यात येणाऱ्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे.


कोल्हापुरातल्या हनुमाननगरमध्ये या पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. शिल्पकार संताजी चौगुले यांनी हा पुतळा बनवला असून, या पुतळ्याची उंची तब्बल 22 फूट उंच आहे.



जवळपास दीड वर्षापासून या पुतळ्याचं काम सुरु होतं. 22 फूट उंच असलेल्या या पुतळ्याचं वजन तब्बल 4 टन आहे. हा ब्रॉन्झचा पुतळा आहे. अवघ्या काही दिवसात हा पुतळा कोल्हापूरहून कल्याणकडे रवाना होणार आहे.



काही दिवसांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या या पुतळ्याला पाहून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते. तोच पुतळा आता काही दिवसातच कल्याण डोंबिवली महापालिकेची शान वाढवणार आहे.

कल्याण- डोंबिवली महापालिकेच्यावतीनं हा पुतळा उभारला जाणार आहे.

आधी या पुतळ्याचं मुंबईत काम झालं. त्यानंतर ब्रॉन्झच्या कामासाठी तो कोल्हापूरला नेण्यात आला.

बाळासाहेबांनी आपल्या अमोघ वाणी, वक्तृत्व आणि खास ठाकरी शैली याच्या जोरावर कायमच उपस्थितांची मने जिंकून घेतली आहेत. बाळासाहेबांची खास शैली आणि भाषण करताना उभं राहण्याची विशिष्ट लकब अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा हा पुतळा तयार करण्यात आला आहे.

संबंधित बातमी

मुंबईत उभा राहणार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा 22 फुटी पुतळा, पुतळ्याचे काम प्रगतीपथावर!