जालना : बुलडाण्याचा पैलवान बाला रफिक शेख यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. बालानं किताबासाठीच्या लढतील गतविजेत्या पुणे शहरच्या अभिजीत कटकेचा 11-3 असा पराभव केला. या विजयासह बाला रफिकनं पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. मात्र महाराष्ट्र केसरीपर्यंत पोहोचण्याचा हा प्रवास अत्यंत संघर्षपूर्ण आहे.

बुलडाण्याकडून महाराष्ट्र केसरीमध्ये कुस्ती खेळणारा बाला रफिक शेख करमाळा तालुक्यातील खडकी गावचा. बाला रफिक शेखचा खेळ पाहण्यासाठी खडकी आणि परिसरातून अनेक गाड्या जालन्याला आल्या होत्या. बाला राफिक हा अतिशय गरीब परिस्थितीतून मेहनतीच्या जोरावर या स्थानी पोहोचला आहे. त्याच्या घरात विविध कुस्त्या जिंकलेल्या गदा आणि मेडल ठेवायलाही आता जागा शिल्लक नाही.

बाला रफिक शेखच्या घरची परिस्थिती बेताचीच आहे. त्याला दोन वेळचा खुराकही व्यवस्थित मिळत नव्हता. पण घरातच कुस्ती होती. तीच परंपरा बाला रफिक शेखने कायम ठेवली. त्याने कधीही प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ केला नाही. बुलडाण्यामध्ये बाला रफिक शेखचे नाव गाजायला सुरुवात झाली. पण त्यानंतर त्याला बुलडाण्यामध्ये चांगले प्रशिक्षण मिळत नव्हते. त्यासाठी त्याने पुणे गाठले. पुण्याचा त्याला दोन चांगले गुरु मिळाले आणि त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत जेतेपद पटकावत त्याने गणेश दांगट आणि गणेश घुले या प्रशिक्षकांचा विश्वास कायम ठेवला.

वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण
बाला रफिकने मानाची गदा पटकावल्यानंतर त्याचे 65 वर्षीय वडील आझम शेख यांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते. त्यांना हा आनंद शब्दात सांगता येत नव्हता. अत्यंत भावुक होऊन त्यांनी मुलाच्या विजयी उत्सव साजरा केला. माझ्या मुलाने हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकरांचं आणि आमचं स्वप्न पूर्ण केलं असल्याचे त्यांनी सांगितले.



किताब हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकरांना समर्पित
बाला रफिकनं पहिल्यांदाच महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. त्यानं विजयानंतर आपला किताब हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकरांना समर्पित केला. बाला रफिक सध्या पुण्याच्या हनुमान आखाड्यात गणेश दांगट, गणेश घुले आणि गोरख वांजळे या वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. त्याआधी त्यानं कोल्हापूरच्या न्यू मोतीबाग तालमीत कुस्तीची बाराखडी गिरवली होती. अभिजीत कटकेनं काल सोलापूरच्या रविंद्र शेडगेला चीतपट करत मॅट विभागातून अंतिम फेरी गाठली होती. महाराष्ट्र केसरीची अंतिम फेरी गाठण्याची ही अभिजीतची तिसरी वेळ होती. माती विभागातून बाला रफिकनं रत्नागिरीच्या संतोष दोरवडवर मात करत महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत पहिल्यांदाच धडक मारली होती.

62 व्या वरिष्ठ राज्य कुस्ती स्पर्धेत बाला रफिक महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी ठरला. गतविजेत्या अभिजीत कटकेला त्याने 11-3 इतक्या गुणफरकाने पराभूत केले आहे. अभिजीत कटके हा मॅटवरचा मातब्बर पैलवान आहे. असे असतानाही बाला रफिकने त्याच्यावर मात केली. तिसऱ्यांदा मॅट विभागाची सेमीफायनल जिंकून अभिजीत फायनलमध्ये पोहोचला होता. परंतु बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने हा सामना एकतर्फी जिंकला. पुण्याचा अभिजीत कटके की बुलडाण्याचा बाला रफिक शेख कोण होणार 'महाराष्ट्र केसरी' याची उत्सुकता महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना लागली होती. जालन्याच्या आझाद मैदानात आज सायंकाळी दोघांमध्ये सामना झाला.