जालना : जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांच्यासह दोघांना तीन लाखांची लाच मागितल्याप्रकरणी काल एसीबीने अटक केल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. जिल्हा विशेष न्यायालयाने इतवारे यांना जामीन मंजूर केला.
यापूर्वी इतवारे यांच्या औरंगाबाद आणि जालना येथील निवस्थानी एसीबीकडून झाडाझडती घेण्यात आली. मात्र, यात काहीही आक्षेपार्ह आढळलं नसल्याचं एसीबी कडून सांगण्यात आलं.
डेटा एंट्री ऑपरेटिंग करणाऱ्या एका खाजगी एजन्सी धारकाचं 60 लाख रूपयांचं बिल देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे यांनी एकूण रकमेच्या 15 टक्के म्हणजे 4 लाख 50 हजारांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती इतवारे यांनी 3 लाखांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दिली होती.
इतवारे यांनी लाच मागितल्याच निष्पन्न झाल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज इतवारे यांना जिल्हा विशेष न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आज त्यांना जामीन मंजूर केला.