अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमला अखेर जामीन मंजूर झाला आहे. 15 हजाराच्या जातमुचलक्यावर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे जामीन दिल्यावर छिंदम केव्हाही कारागृहाच्या बाहेर येऊ शकतो.
शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या छिंदमने जनक्षोभ उसळल्यावर व्हिडिओ प्रसारित करुन माफीनामा मागितला. मात्र आता छिंदमनं ‘तो मी नव्हेच’ अशी भूमिका घेतली आहे. छिंदमनं मी निर्दोष असून राजकीय अकसापोटी मला गुंतवण्यात आल्याचं अर्जात म्हटलं आहे. त्याचबरोबर, “मी घरातील एकमेव कर्ता पुरुष आहे. आई आजारी असून, दोन लहान मुले असल्यानं देखभालीसाठी जामीन मिळावा.”
सरकारी वकिलांनी जामिनाला तीव्र आक्षेप घेतला. छिंदम बाहेर आल्यास तपासावर दबाव आणण्याची आणि पुरावा नष्ट करण्याची शक्यता वर्तवली. त्याचबरोबर छिंदमच्या जीविताला धोका असून कायदा सुव्यवस्थेचा धोकाही वर्तवला आहे. मात्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण जामीन मंजूर केला आहे.
छिंदम सध्या न्यायालयीन कोठडीत, असून नाशिक कारागृहात आहे. छिंदमची कोठडी चौदा तारखेला संपत होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी न्यायालयात परवानगी मागून यापूर्वीच त्याला न्यायालयात हजर करण्याची विनंती केली होती. पोलिसांच्या विनंतीनुसार शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केलं होतं. छिंदमवर वकिलांनी बहिष्कार टाकल्यानं त्यानं जामिनासाठी स्वतः अर्ज केला होता.
छिंदमवर तोफखाना पोलीस ठाण्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करुन सामाजिक तेढ निर्माण करणे, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात छिंदमला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. तर सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी दर रविवारी दोन ते तीन यावेळीत हजर राहण्यास आणि पुरावा नष्ट न करण्याचा अटीवर जामीन मंजूर केला आहे.
दरम्यान, शुक्रवारीच 19 तारखेपर्यंत छिंदमच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केली. त्यामुळे छिंदमची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. दरम्यान छिंदमला जामीन मिळाला असल्याने त्याची केव्हाही सुटका होऊ शकते.
छिंदमला जामीन मंजूर, कोणत्याही क्षणी जेलबाहेर येणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2018 08:53 PM (IST)
छिंदमवर तोफखाना पोलीस ठाण्यात महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान करुन सामाजिक तेढ निर्माण करणे, आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात छिंदमला 15 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -