पंढरपूर : पंढरपूर म्हटलं की आपल्याचा कष्टकऱ्यांचा, शेतकऱ्यांचा, गोरगरिबांचा विठ्ठल आपल्याला आठवतो. परंतु त्याच पंढरपुरात आता दोन विठ्ठल पाहायला मिळणार आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर बडव्यांना वंशपरंपरागत असलेला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा ताबा सोडावा लागला. त्यामुळेच बडवे समाजातील बाबासाहेब बडवे यांनी पंढरपूरमध्ये नवे विठ्ठल मंदिर उभारले. या मंदिरात आज विठुरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

वंशपरंपरागत बडवे आणि उत्पात समाजाकडे पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरांचा ताबा होता. परंतु मंदिर शासनाच्या ताब्यात गेल्यानंतर येथे पगारी पूजारी नेमण्यात आले आहेत. त्यामुळे काही दिवसांनंतर उत्पातांनी स्वतंत्र रुक्मिणी मंदिर उभारले. उत्पातांच्या पावलावर पाऊल ठेवत बडव्यांनीदेखील विठ्ठलाचे स्वतंत्र मंदिर उभारले आहे.

पंढरपुरात दोन विठ्ठल मंदिरं उभारल्यानंतर आता भाविकांनी, वारकऱ्यांनी कोणत्या विठ्ठलाकडे गाऱ्हानं मांडायचं असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.

बडव्यांनी उभारलेल्या मंदिरात आज विठुराया विराजमान झाला आहे. समाजातील मंडळीना उपासना करता यावी यासाठी बाबासाहेब बडवे यांनी आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ हे नवे विठ्ठल मंदीर उभारले आहे .