Badlapur School Case: राज्यासह देशाला हादरवून सोडलेल्या बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर अत्याचाराच्या घटनेने संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. तर मंगळवारी (20 ऑगस्टला) बदलापूरमध्ये संतापाची लाट उसळल्याचे पाहायला मिळाले. संतापलेल्या पालकांनी आणि इतर नागरिकांनी रेल्वेसेवा बंद पाडली, मात्र, हे विरोधकांचे कटकारस्थान असून हे आंदोलक बदलापूरच्या बाहेरचे होते, असा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. यावर, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काही कागदपत्रे शेअर करत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 


विरोधकांचे कटकारस्थान असून हे आंदोलक बदलापूरच्या बाहेरचे होते, या दाव्यावरती संजय राऊतांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत म्हटलं आहे की, "देवेंद्र फडणवीस जी, उघडाडोळे..बघा नीट! बदलापूर आंदोलकांचे हे पोलीस रिमांड एप्लीकेशन आहे. सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत. आपले मंत्री सांगत होते आंदोलक  भाडोत्री आणि बाहेरची आहेत! काय लायकीची माणसं आपल्या मंत्रीमंडळात आहेत!", अशा शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारवर टीका केली आहे. 






नेमकं काय आहे प्रकरण?


बदलापुरातील एका नामांकित शाळेमध्ये सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने दोन चिमुरड्यांवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर मंगळवारी बदलापूरमध्ये पालकांनी आणि नागरिकांनी शाळेला वेढा घातला, लोक हातात फलक घेऊन रस्त्यावर उतरले, यावेळी संतप्त पालकांनी आणि नागरिकांनी शाळेत घुसून तोडफोड केली. तर, काही पालक नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात आंदोलन करत रेल्वे सेवा बंद पाडली. आंदोलनामुळे बदलापूर ते कर्जत रेल्वेसेवा पूर्णपणे ठप्प झाली. यानंतर पोलिसांकडून सुमारे 300 जणांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलं त्याचबरोबर, काहींना अटक केल्याचे सांगण्यात येते.


हे आंदोलन म्हणजे विरोधकांचे कटकारस्थान- एकनाथ शिंदे


राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आंदोलन म्हणजे विरोधकांचं कटकारस्थान असल्याचं म्हटलं आहे. बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर झालेला अत्याचार ही खेदजनक बाब आहे. पण हे आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित होते. या आंदोलनात स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते. आंदोलनाच्या ठिकाणी गाड्या भरून भरून या काही आंदोलनकर्ते आले होते. त्यांना सरकारची बदनामी करायची होती, असा दावा यावेळी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केला आहे.


आंदोलकांमधील काही लोक राजकीय हेतूने आलेत- गिरीश महाजन


आंदोलकांमधील काही लोक राजकीय हेतूनं आल्याचं म्हटलं. तिथं लाडकी बहीण योजनेचे पोस्टर्स हाती दिसून आले, या घटनेचा काहीही संबंध नसताना, जाणीवपूर्वक पोस्टर्स छापून आंदोलनस्थळी आणले होते. विरोधकांनी इतकी पातळी सोडावी याची कमाल वाटते. ही घटना कुठली आहे, त्याची तीव्रता काय, गांभीर्य काय, हे आपण पाहत नाही. आपला राजकीय फायदा कसा होईल, यासाठी ठराविक लोकांना येथे सोडून देण्यात आले. आंदोलनकर्त्यांमध्ये स्थानिक लोक किती होती आणि बाहेरची किती होती हे सिद्ध होईल, असं ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) म्हणाले. 


या सर्व दाव्यांवरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या सोशल मिडीयावरती पोलीस रिमांड संबधी काही कागदपत्रे शेअर करत देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. आपले मंत्री सांगत होते, आंदोलक भाडोत्री आणि बाहेरचे आहेत, पण सर्व आंदोलक बदलापूरचेच आहेत, असे सांगतानाच, काय लायकीची माणसे आपल्या मंत्रिमंडळात आहेत, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.