पंढरपूर: विधानपरिषदेच्या निकालाचा विधानसभा (VidhanSabha) अथवा लोकसभा निवडणुकीवर (Loksabha Election) कोणताही परिणाम होत नसतो, मात्र मंत्रिमंडळ विस्तार न केल्यास त्याच फटका शिंदे-फडणवीस सरकारला बसू शकतो असा घरचा आहेर प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला. ते पंढरपुरात बोलत होते. 


शिक्षक आणि पदवीधर जागांच्या झालेल्या निवडणुकीत दोन लाखांच्या आसपास मतदान असल्याने याचा कोणताही परिणाम विधानसभा अथवा लोकसभेच्या निकालावर होत नसतो. पण हे जरी खरं असलं तरी तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने कामे खोळंबू लागली आहेत. त्यामुळे जनतेत नाराजी आहे, आणि याचा फटका सरकारला बसू शकतो असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. 


या विधानपरिषद निवडणुकीत जुन्या पेन्शनचा मुद्दा समोर आल्याने असे निकाल लागले. हे मतदार संघटित असल्याने त्यांचा निकाल आणि ताकद दाखवू शकले. मात्र यांच्या कित्येक पटीने जास्त असणाऱ्या असंघटित शेतकरी, शेतमजूर , कामगार वर्गाचे प्रश्न यापेक्षा गंभीर आहेत. तरीही त्याकडे लक्ष दिले जात नसल्याचं कडू यांनी सांगितले.


अनेक जिल्ह्यांना एकच पालकमंत्री


राज्यात एका मंत्र्याकडे अनेक खाती आहेत. तसेच अनेक जिल्ह्यांना एकच पालकमंत्री असल्याने लोकांची कामं होत नाहीत. अशावेळी तातडीने मंत्रिमंडळ विस्तार केल्यास लोकांचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मात्र अशीच स्थिती राहिल्यास लोकांच्या रोषाला या सरकारला सामोरे जावे लागेल असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. 


ठाकरे-आंबेडकर सत्तेसाठी एकत्र


उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची युती म्हणजे कट्टर भगवा आणि कट्टर नाल्याची युती आहे. नेते एक झाले तरी मतदार किती एक होणार हा प्रश्न असून या निळ्या आणि भगव्या युतीचे कारण केवळ सत्ता मिळवणे आहे असं बच्चू कडू म्हणाले. भाजपाला किंवा काँग्रेसला रोखणं आणि सत्ता मिळविणे यासाठी ठाकरे-आंबेडकर एक झालेले असून हे जनतेला कळतंय. खरेतर हे दोघे जनतेचे कोणतेही प्रश्न समोर घेऊन एक झाले असते तर समजू शकलो असतो, मात्र भगवा आणि निळा केवळ खुर्चीसाठी जवळ आल्याचा टोला बच्चू कडू यांनी लगावला . 


गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात राज्याच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता. त्यानंतर या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार अशी चर्चा दर 15 दिवसांनी व्हायची. पहिल्या मंत्रिमंडळात बच्चू कडू यांना स्थान मिळालं नव्हतं. त्यांनंतर प्रत्येक चर्चेमध्ये त्यांचं नाव आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर बच्चू कडू यांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये बच्चू कडू यांना कॅबिनेट मंत्रीपदाची संधी मिळणार असल्याची माहिती आहे.