Bacchu Kadu : 'मै झुकेंगा नही' हे बॅनर म्हणजे कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे मत आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी व्यक्त केले. आम्ही 20 वर्ष दिव्यांगांसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणं आंदोलन केली. जर कोणी येऊन असे आरोप करत असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होतात असेही बच्चू कडू म्हणाले. आज आमची भूमिका जिल्हा प्रमुख यांच्याशी बैठक करुन जाहीर करणार आहे. माझी भूमिका मी जाहीर करणार नाही तर एक दिव्यांग व्यक्ती जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.


अपार मेहनत करुन संघटन उभं केलं


आज होणाऱ्या बैठकीबाबत एबीपी माझानं बच्चू कडू यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी आज 11 वाजता आमच्या जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. यामध्ये काही दिव्यांग बांधव देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली.  ही बैठक झाल्यानंतर एक दिव्यांग बांधव पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. आजच्या मेळाव्याची जी काही तयारी केली आहे ती कार्यकर्त्यांनी केली आहे. 20 ते 25 वर्ष मेहनत करुन संघटन उभं केलं आहे. हे संघटन सहज उभं राहत नाही. त्यासाठी प्रचंड मेहनत, कष्ट लागत असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. दरम्यान, मै झुकेंगा नही' हे बॅनर कार्यकर्त्यांच्या भावना असल्याचे त्यांनी सांगितले.


पैसा, पद आणि सत्ता याच्यासमोर आम्ही कधीही झुकणार नाही


आमचा जो लढा आहे, तो लढण्यासाठी कोणासमोर झुकण्याची काही कारण नाही. काही लोकांना वाटते की सत्तेसमोर आम्ही झुकू. पैशासमोर झुकू. पण पैसा, पद आणि सत्ता याच्यासमोर आम्ही झुकणार नसल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. आम्ही झुकलो असतो तर आम्ही गप्प बसलो असतो किंवा त्या घटनेकडू कानाडोळा केला असता असे कडू यावेळी म्हणाले. सामन्यांसाठी लढा उभा करताना आम्ही कधी पर्वा केली नाही. अधिकारी असो किंवा मंत्री असो हे कधी बघितलं नाही. दिव्यांग बांधवांच्या वेदनांनी आम्हाला खरी संघर्षाची धार दिली असल्याचे बच्चू कडू यावेळी म्हणाले. आम्ही सत्तेसमोर कधीही झुकणार नाही. सरकार आणि विरोधक किंवा जनता आणि आपण यात आपली भूमिका काय आहे, आपण कशी पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे हे आम्ही आज स्पष्ट करु असेही बच्चू कडू यांनी यावेळी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: 


Bacchu Kadu  : अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडूंच्या भूमिकेकडं लक्ष, मेळाव्याच्या ठिकाणी झळकले 'मै झुकेगा नही' चे पोस्टर