मुंबई : निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी पाठिंबा दिला होता. परंतु गेल्या काही दिवसांत राज्यातली सत्तेची समीकरणं बदलली आहेत. काही पक्षांकडून आमदार फोडण्याचा, लहान पक्षातील आमदारांना, अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा परिस्थितीत आमदार बच्चू कडू मात्र अद्याप शिवसेनेसोबतच आहेत. याबाबत कडू यांनी स्वतःच एबीपी माझाला माहिती दिली.


राज्यातील सर्व पक्ष सध्या आपल्या आमदारांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू मात्र त्यांच्या मतदारसंघात, मुंबईत बिनधास्त फिरत आहेत. आंदोलन करत आहेत. त्यामुळे बच्चू कडू यांच्याशी संपर्क करणे कोणासाठीही सहज शक्य आहे. याचाच फायदा घेऊन बच्चू कडू यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. परंतु आपण शिवसेनेसोबतच आहोत, हे त्यांनी एबीपी माझाकडे स्पष्ट केले.

कडू म्हणाले की, मी शिवसेनेसोबतच आहे. याबद्दल कोणतीही शंका नसावी. राजकारणात एकदा घेतलेला निर्णय कोणत्याही मोठ्या कारणांशिवाय बदलला जात नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, महाविकासआघाडी सध्या मजबूत स्थितीत आहे, त्यामुळे ते सरकारस्थापन करु शकतील.

कडू यांना विचारण्यात आले की, तुमचा शिवसेनेसोबत असण्याचा निर्णय बदलण्यासाठी कोणी प्रयत्न करत आहे का? यावर कडू म्हणाले की, आमच्या पक्षाचे अध्यक्ष मुंबई किंवा दिल्लीत राहात नाही. मी खेड्यातला माणूस आहे. मला केवळ माझा मतदार आदेश देऊ शकतो.

भाजपकडून निमंत्रण आलं, पण... : बच्चू कडू 



सांगून मोर्चा काढला म्हणून मोर्चा रोखला, पुढच्या वेळी न सांगता राजभवनात घुसू : बच्चू कडू



ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या आंदोलनानंतर आमदार बच्चू कडू पोलिसांच्या ताब्यात