चंद्रपूर : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून अनोखे राजकीय नाट्य घडत आहे. रोज नव्या नव्या घडामोडींनी राजकारणी लोकांसह सामान्य माणूस देखील हैराण झाला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात या घटनेचे वेगवेगळे पडसाद उमटत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातल्या एका शिक्षकाने हा घटनाक्रम असह्य झाल्याने चक्क एक दिवसाची रजा मिळावी असा अर्ज मुख्याध्यापकांना केला आहे. त्यांचा हा अर्ज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून महाराष्ट्राला या धक्क्यातून सावरण्यासाठी निश्चित वेळ मिळावा, अशी भावना त्यांनी बोलून दाखवली आहे. त्यांचा हा अर्ज सोशल मीडियात प्रचंड लोकप्रिय होत असून महाराष्ट्रातील तमाम जनतेची अशीच भावना असल्याचे बोलले जात आहे. कोणाचेही सरकार येवो मात्र महाराष्ट्र लवकर सावरला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी भावना या शिक्षकाने व्यक्त केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातल्या एका शिक्षकाने हा घटनाक्रम असह्य झाल्याने चक्क एक दिवसाची रजा मिळावी असा अर्ज मुख्याध्यापकांना केला आहे. जहीर सय्यद असं सुट्टी मागणाऱ्या शिक्षकाचे नाव आहे. ते गडचांदूर शहरातील सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे शिक्षक आहे. 'मी पुरता हललो आहे, यातून सावरायला मला एका दिवसाची रजा द्या' अशी लेखी विनंती जहीर सय्यद यांनी शाळेच्या हेडमास्तरांकडे केली. त्यांचा हा सुट्टीचा अर्ज पाहून आणि सुट्टीसाठी देण्यात आलेले कारण पाहून शाळेचे हेडमास्तर पण थोडा वेळ संभ्रमात पडले. मात्र त्यांनी या कारणासाठी सुट्टी मिळणार नाही असं सांगत सुट्टी नामंजूर केली.



राजकीय उलथापालथीमुळे त्रस्त झालेल्या या शिक्षकाचा सुट्टीचा हा अर्ज नामंजूर झाला असला तरी त्यांचा हा अर्ज सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आणि महाराष्ट्रालाच या धक्क्यातून सावरण्यासाठी निश्चित वेळ मिळावा अशी भावना नेटकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. सय्यद यांच्या मते सध्या राज्यातील राजकीय वारे इतक्या वेगाने बदलताय की सामान्य माणूस यामुळे पुरता गांगरून गेला आहे. शुक्रवारच्या रात्री शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार अशा बातम्या आल्या. सकाळी वर्तमानपत्रांमध्ये देखील आशयाच्या बातम्या छापून आलं. मात्र पेपर हातात पडेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांचा राज्याच्या मुख्यमंत्री पदी शपथविधी झाला होता.

खरं म्हणजे हा राजकीय भूकंप राज्यातील अनेक लोकांच्या पचनीच पडला नाही आणि अशीच काहीशी अवस्था जहीर सय्यद यांची देखील झाली. आता मात्र त्यांचा हा अर्ज समाजमाध्यमात प्रचंड लोकप्रिय होत असतांनाच महाराष्ट्रातील तमाम जनतेची अशीच भावना असल्याचे देखील बोलले जात आहे. राज्यात कोणाचेही सरकार आले किंवा कोणीही मुख्यमंत्री झाला तरी त्याचे स्वागतच आहे. राज्यात कोणाचेही सरकार येवो मात्र महाराष्ट्र लवकर सावरला पाहिजे, शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी भावना या सुट्टीचा अर्ज लिहिणाऱ्या शिक्षकाने व्यक्त केली आहे.