Mumbai Congress :  मुंबई काँग्रेसला आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व येथील आमदार झिशान सिद्दीकी ( Zeeshan Siddique) आणि त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. झिशान सिद्दीकी आपला राजीनामा वरिष्ठांकडे सुपूर्द करणार असून 10 फेब्रुवारीला वांद्रे येथे होणाऱ्या 'सरकार आपल्या दारी' कार्यक्रमात अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  मागील काही दिवसांपासून मुंबई काँग्रेसमध्ये फूट पडणार असल्याची चर्चा होती. 


काही दिवसांपूर्वी काँग्रेसमधून मिलिंद देवरा यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे काँग्रेसचा हात सोडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सहभागी होणार आहे. मुंबईतील वांद्रे आणि परिसरातील अल्पसंख्यांक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे. 


कोण आहे बाबा सिद्दीकी?


झियाउद्दीन उर्फ बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसचे महत्त्वाच्या नेत्यांपैकी एक समजले जातात. 1999, 2004 आणि 2009 मध्ये ते सलग तीन वेळा वांद्रे पश्चिम मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खातीदेखील सांभाळली आहेत. बाबा सिद्दीकी हे 1992 आणि 1997 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी झाले होते. . 2000-2004 या कालावधीत काम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने म्हाडा मुंबई बोर्डाचे अध्यक्ष म्हणून सिद्दीकी यांची नियुक्तीही केली होती.बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या समितीवर महत्त्वाच्या पदावर आहेत. 


झिशान सिद्दीकी कोण आहेत?


झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला.झिशान हे त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून निवडून आले होते. त्याशिवाय झिशान यांनी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडली होती.