अहमदनगर : एक खुनी सभागृहात आहे, पंतप्रधान म्हणून, तर दुसरा खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे, असे म्हणत माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. कोळसे पाटलांच्या या विधानानं आता वाद उभा राहण्याची शक्यता आहे.


“पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन-तीन हजार मुस्लिमांची कत्तल करुन आले आहेत. मोदींच्या इतक्या हत्या कोणत्याच पंतप्रधानांनी केल्या नाहीत. एक खुनी सभागृहात आहे पंतप्रधान म्हणून, तर एक खुनी पक्षाचा अध्यक्ष आहे.”, अशी टीका कोळेस पाटलांनी केली.

“मोदींची लोकप्रियता कृत्रिम आहे. खरी लोकप्रियता नेहरुंची होती, इंदिरा गांधींची होती, गांधीजींची होती. मोदींची लोकप्रियता मॅनेज केलेली आहे.”, असा निशाणाही कोळसे पाटलांनी साधला.

बी. जी. कोळसे पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे संबंधांवर टीका केली. शिवाय, आर्यभट्ट ब्राह्मण एकमेव शत्रू असून हिंदू मुस्लिमांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.

अहमदनगरमध्ये विराट सामाजिक ऐक्य परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. ऐक्य परिषदेला सत्यपाल महाराज, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे प्रवक्ते मौलाना सज्जाद नौमानी, जमाते इस्लामी हिंदचे तौफिक अस्लाम खान, अखिल भारतीय बसव परिषदेचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद हैबतपूरे, स्मिता गोविंद पानसरे, अखिल भारतीय माळी महासंघाचे शंकरराव लिंगे, मराठा सेवा संघ, बामसेफसह अनेक मान्यवर यांची उपस्थिती होते.

सावित्री-फातेमा विचार मंचाच्या वतीने या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सर्वच मान्यवरांनी हिंदूत्व, ब्राह्मणवाद, भाजप आणि संघावर जोरदार टीका केली.

देशात अघोषित आणीबाणी : स्मिता पानसरे

यावेळी स्मिता पानसरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  नेतृत्वाखाली अघोषित आणीबाणी सुरु झाल्याचं म्हटलं. गोहत्या, लव्ह जिहाद, घरवापसी हे घडवून आणलं जातं असून, हिंदुत्वाचा केंद्रीत कार्यक्रम आहे. पंतप्रधान मन की बात करतात. मात्र तसं वागत नाहीत. त्यांचा रिमोट आरएसएसकडं असल्याचं स्मिता पानसरे म्हणाल्या.