औरंगाबाद : हजारो औरंगाबादकरांना गॅस्ट्रोची लागण दूषित पाण्यामुळेच झाली असल्याचं समोर आलं आहे. शहरातील छावणी भागातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं तपासणी अहवालात समोर आलं. हा तपासणी अहवाल एबीपी माझाच्या हाती लागला आहे.


औरंगाबादमध्ये अचानक गॅस्ट्रोची साथ पसरल्यानंतर आरोग्य विभागाने छावणी भागातील पाण्याचे नमुने घेतले होते. त्यानंतर या पाण्याची तपासणी करण्यात आली. हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाली, असं तपासणी अहवालात समोर आलं.



औरंगाबादमधल्या छावणी परिसरातून या रोगाची सुरुवात झाली. छावणीतील विविध भागांतील अनेक नागरिकांना मध्यरात्रीनंतर अचानक पोटदुखी, जुलाब आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. पाहता पाहता या त्रासाने संपूर्ण छावणी परिसराला वेढा घातला. लहान मुले, महिला-पुरुष, युवक-युवती, ज्येष्ठ अशा सर्वांना या आजाराने वेढले असल्यामुळे उपचारासाठी नागरिकांनी छावणी सामान्य रुग्णालयात धाव घेतली.