औरंगाबाद: महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराला मराठा मोर्चा जबाबदार नाही, या दाव्याला आता पुष्टी मिळत आहे. कारण औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वत:च वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.


मराठा आंदोलनात काही बाहेरचे लोक घुसले असल्याची तक्रार क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मात्र हे लोक नेमक्या कुठल्या चळवळीशी संबंधित होते याबाबत तपासानंतरच सांगता येईल असंही चिरंजीव प्रसाद म्हणाले.

9 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीत बंद कंपन्यांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती.

मात्र ही तोडफोड मराठा मोर्चेकऱ्यांनी नाही तर बाहेरच्या व्यक्तींनी केल्याचा दावा मराठा मोर्चाच्या आयोजकांनी केला होता. तसंच त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती.

सध्या पोलिसांचं अटकसत्र सुरु असून, या तोडफोडप्रकरणी 53 जणांना अटक केली आहे. आधी अटक केलेल्या 37 जणांमध्ये 18 जण हे मराठा समाजाचे नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी या तोडफोडीचा आणि मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

पोलिस आयुक्त काय म्हणाले?

वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणी आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये गंभीर कलमे लागली आहेत. आम्हाला जे व्हिडीओ मिळाले, कंपन्यांमधून मिळाले, काही व्हिडीओ आम्ही शूट केले, काही लोकांनी दिले, त्यानुसार आम्ही  53 लोकांना अटक केली आहे.  अजून अटकसत्र सुरुच आहे.

तोडफोड करणारे मराठेतर होते का?

आम्ही आरोपीकडे बघताना जात बघत नाही. परंतु आम्ही हे ठामपणे सांगतो की ते गुन्हेगार आहेत आणि त्यांचा मराठा चळवळीशी संबंध नाही. आतापर्यंतच्या तपासात एकदम क्लिअर झालं आहे की तोडफोड करणाऱ्यांचा आणि मराठा मोर्चाचा किंवा त्यांच्या समन्वयकांचा काहीही संबंध नाही. गुन्ह्याच्या उद्देशानेच त्यांनी ही तोडफोड केली आहे, असं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं.

मोर्चाआडून तोडफोड करण्याची काय कारणं आहेत?

आम्ही कारणं शोधतोय. बहुतेक मुलं आहेत ते या किंवा अन्य कंपनीत तात्पुरते/हंगामी कर्मचारी म्हणून कामं केलं आहे, असं प्रसाद यांनी सांगितलं.

मोर्चाआडून काही चळवळीचे लोक घुसले?

क्रांती चौक परिसरात अशी एक तक्रार दाखल झाली. त्याअनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही विविध फुटेज आणि लोकांचे जबाब नोंदवत आहोत. क्रांती चौक परिसरात बऱ्याच समाजाचे बरेच लोक होते. त्यामुळे आताच बोलणं योग्य नाही. तपासाअंती कमेंट करणं उचित ठरेल, असं चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं.



नवा व्हिडीओ

वाळूजमध्ये झालेल्या विध्वंसाचा नवा व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. वाळूजमधल्या एमआयडीसीमध्ये घुसलेल्या आंदोलकांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कसा धुडगूस घातला याचा पुरावा देणारा हा व्हीडिओ पोलिसांकडेही देण्यात आलेला आहे.  त्यामुळे त्यातल्या चेहऱ्यांना हेरून त्यांची धरपकड सुरु झालेली आहे.

आमदार हर्षवर्धन जाधवांचा आरोप

औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील तोडफोड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सप्लाय चेनमधील लोक आणि परप्रांतियांनी केली असून, त्याचं बिल मराठा आंदोलकांवर फाडलं जातंय, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. तसेच, तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी स्वतःचे प्रायव्हेट इश्यूज सेटल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव काल जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

वाळूज तोडफोड प्रकरण

वाळूज एमआयडीसीतील 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, 60 कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेतलं असून, 37 जणांवर अटकेची कारवाई केली आहे.

तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी 

वाळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली.

संबंधित बातम्या 

वाळूज एमआयडीसीत तोडफोड करणारे 18 जण मराठेतर

वाळूज MIDC तोडफोडीत परप्रांतियांचा हात : हर्षवर्धन जाधव

वाळूज एमआयडीसी तोडफोडीचे पंचनामे, 60 कोटीचं नुकसान, धरपकड सुरुच