Aurangabad Scam : 30-30 Scam : मराठवाड्यातील एक मोठा घोटाळा (Big Scam in Marathwada) अशी चर्चा असणाऱ्या आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या 'तीस-तीस' घोटाळ्यात पहिला गुन्हा औरंगाबाद ग्रामीण पोलिसात दाखल झाला आहे. औरंगाबादच्या बिडकीन पोलीस ठाण्यात याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल झाला आहे. यातील मुख्य आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. 


मराठवाड्यातील 30 -30 घोटाळ्याचे औरंगाबादसह मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना अधिकचा व्याजदर देण्याचे अमिष दाखवून संतोष राठोड यानं 'तीस-तीस' योजनेत पैसे गुंतवण्यासाठी सर्वांना भरीस पाडलं. बँकेत मिळणाऱ्या व्याजाच्या चारपट अधिक व्याज देऊन सुरुवातील स्वतःचं मार्केटींग केल्यानंतर राठोड गेल्या 8 महिन्यांपासून फरार आहे. त्यामुळे अधिकच्या व्याजदरासह पैशांबाबत अपेक्षाभंग झाल्यानं पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलनं बिडकीन पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.   


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा घोटाळा कोट्यवधींचा आहे. विशेष म्हणजे, यात मोठ्याप्रमाणावर शेतकरी अडकले आहेत. ज्या भागांत सरकारी प्रकल्प राबवले जातात, त्या भागांतील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यावर राठोड याने लक्ष ठेवून शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. पोलीस आता राठोड यांचा शोध घेत असून, तो सध्या फरार झाला असल्याचं बोलले जात आहे.


'तीस-तीस' घोटाळा नक्की आहे तरी काय?


औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील एका तरुणाने 2016 मध्ये दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी ( DMIC) जमिनी गेलेल्या भागांत शिरकाव करून शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी वेगवेगळी आमिषे दाखवली. विशेष म्हणजे, औरंगाबादच्या बिडकीन आणि परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवलं गेलं. सुरुवातीला शेतकऱ्यांना महिन्याला 5 टक्क्यांनी परतावा देण्याचं मार्केटिंग या तरुणानं केलं.  त्यानंतर मात्र या तरुणानं पुढे महिन्याला 25 टक्क्यांनी परतावा परत द्यायला सुरुवात केली. यासाठी जवळच्या नातेवाईकांना सोबत घेत 'तीस-तीस' नावाचा ग्रुप बनवला. मग अलिशान गाड्यांचा ताफा गावा-गावात फिरू लागला. लोकांना परतावा देण्यासाठी थेट गोण्यांमधून पैसे आणले जाऊ लागले, त्यामुळे लोकांचाही या भामट्यावर आंधळा विश्वास बसला. पुढे पाहता पाहता परिसरातील अंदाजे 30 गावांतील शेतकरी आपल्या जाळ्यात ओढण्याचं काम या तरुणाने केलं. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी सुनील राठोड गेल्या 8 महिन्यांपासून फरार आहे. पैसे मिळण्याची शक्यताच धुसर झाल्यानं पैठण तालुक्यातील जांभळी गावातील गुंतवणूक करणाऱ्या महिलेनं बिडकीन पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यावर फसवणूक झालेल्यांनी पुढं यावं, असं आवाहनही पोलीस करत आहेत. तसेच शेतकऱ्यांना देशोधडीला लावणआऱ्या या भामट्याचा पोलीस कसून शोधही घेत आहेत. 
 
महत्त्वाची बाब म्हणजे, काही राजकीय नेत्यांनीसुद्धा यात पैसे गुंतवणूक केल्यानं शेतकऱ्यांनासुद्धा विश्वास बसला आणि उरल्या सुरल्या लोकांनीसुद्धा कोट्यावधी रुपये अधिकचं व्याज मिळण्याच्या अपेक्षेने गुंतवले. पण आता गेली 8 महिने झाले व्याज सोडा मुद्दल सुद्धा मिळणं अवघड झालं आहे. त्यामुळं हजारो शेतकरी देशोधडीला लागण्याची भिती व्यक्त केली जात आहे.