औरंगाबाद: बॅनर लावून शहरं खराब करु नका असं न्यायालयानं वारंवार सांगितलं आहे. मुख्यमंत्री अथवा कोणतेही केंद्रीय मंत्री शहरात आले की विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते त्यांच्या स्वागताचे बॅनर शहरभर लावतात. याशिवाय वाढदिवस किंवा अन्य कार्यक्रमाचे होर्डिंग्ज दिसतातच. खरं म्हणजे हे थांबवणं पोलिसांचं, महापालिकेचं काम आहे. मात्र औरंगाबामध्ये चक्क पोलीस प्रशासनाकडूनच मुख्यमंत्र्याच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी मुख्यमंत्र्याच्या स्वागतांचे बॅनर लावले. औरंगाबाद पोलीस आपले सहर्ष स्वागत करीत आहे, असं होर्डिंग लावण्यात आलं आहे. यावर औरंगाबाद शहर पोलिसांचे नाविन्यपूर्ण उपक्रम छापण्यात आले आहेत. तसंच बाजूला मुख्यमंत्र्यांसोबत पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांचा फोटो आहे. शहरात आपण काय-काय केलंय, हे दाखवण्याचाच प्रयत्न यशस्वी यादव यांनी या बॅनरमार्फत केल्याचं दिसतं.