दोनशेची पावती देऊन पर्यटकांकडून चारशे घेणारा पोलिस निलंबित
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 10 May 2018 11:25 AM (IST)
एबीपी माझाने बातमी दाखवल्यानंतर पोलिस शिपाई शेख हारुण शेख रशिद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये पर्यटकांकडून पठाणी वसुली करणाऱ्या पोलिसाचं निलंबन करण्यात आलं आहे. 'एबीपी माझा'ने बातमी दाखवल्यानंतर पोलिस शिपाई शेख हारुण शेख रशिद यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पोलिस शिपाई शेख हारुण शेख रशिद पर्यटकांकडून पठाणी वसुली करत असल्याचं कॅमेरात कैद झालं. दोनशे रुपयांची पावती हवी असल्यास पोलिसांकडून 400 रुपयांची मागणी केली जात होती. दोनशे रुपयांच्या पावतीसाठी चारशे रुपये का घेता? असा सवाल पर्यटकांनी केला, तर पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. पर्यटकांनी हुज्जत घालताच पार्किंग वसुलीचं कारण पुढे करण्यात आलं. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. औरंगाबादच्या खुलताबाद पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई शेख हारुण शेख रशिद कार्यरत होते. खुलताबाद पोलिस स्टेशनचे पीआय नोटीस पाठवणार आहेत. औरंगाबाद ग्रामीणच्या एसपी आरती सिंह यांनी ही माहिती दिली. जगप्रसिद्ध वेरुळची लेणी पाहण्यासाठी फक्त राज्यभरातूनच नाही, तर देश आणि परदेशातून पर्यटक दाखल होतात. मात्र या पर्यटकांना पोलिस कशी वागणूक देतात, याचं धडधडीत चित्र समोर आलं आहे. पाहा व्हिडिओ :