Aurangabad News Updates : बहुप्रतिक्षित औरंगाबाद-पैठण रस्त्याच्या चौपदरीकरणाची अधिसूचना निघाल्यानंतर बडे बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आणि राजकारणी शेत जमिनीतून अधिक मावेजा मिळावा म्हणून सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे या बड्या लोकांच्या जमिनींसाठी राष्ट्रीय महामार्गाची दिशा बद्दलल्याचा खटाटोप करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. शिवाय अधिक मावेजा लाटण्यासाठी जमीन धारकांनी जी जमीन रस्त्यात जाणार आहे, त्यावर ती आमराई उभी केली आहे.
 
विशेष म्हणजे ही आमराई चार-पाच दिवसात उभी राहिली आहे. एवढ्या तातडीने आंबे लावण्याचं कारण शासनाकडून रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित करताना अधिक मावेजा लाटण्याचं. काही दिवसापूर्वीच औरंगाबाद पैठण या चार पदरी रस्त्यासाठी जमीन अधिग्रहणासाठी नोटिफिकेशन निघालं. बडे बिल्डर आणि नेतेमंडळींनी जमिनीचा शोध घेऊन विकत घ्यायला सुरुवात झाली.औरंगाबाद जिल्ह्यामध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर, उद्योजक आणि राजकारण्यांनी जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. त्याच जमिनींमधून महामार्ग टाकण्याचा प्रकार घडला आहे. 


जमीन जाणार तिथून आंब्याची झाड का लावली?


आंब्याची झाड अधिग्रहित करत असताना मावेजा अधिक मिळतो.
झाडांचे पैसे देतांना झाडाचं आत्ताच असलेलं वय आणि भविष्यात किती काळ त्याचं फळ मिळू शकतं आणि त्यावेळी त्याची काय किंमत असेल हे सगळं पकडून मावेजा दिला जातो.
त्यामुळे कधीकधी जमिनीच्या पैशापेक्षा झाडाचे पैसे अधिक मिळतात.
 
'बड्या लोकांच्या फायद्यासाठी वळवला!'


गेवराई तांडा येथील गावकऱ्यांनी थेट रस्त्या बड्या लोकांच्या फायद्यासाठी वळवला असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे रस्त्याच्या मावेजासाठी कसे घोटाळे सुरू आहेत, हे समोर आले आहे. औरंगाबाद-पैठण मार्गावर सर्वात छोटे असलेल्या गेवराई तांडा गावासाठी बायपास देण्यात आलाय. तो बायपास गावातील एकाही शेतकऱ्याच्या जमिनीतून जाणार नाही. उलट धनदांडग्यांच्या आणि बड्या लोकांच्या जमिनींना लाभ देण्यासाठी हा खटाटोप केल्याचं दिसून येतंय.


औरंगाबाद-पैठण रस्त्यावर गेवराई तांडा हे सर्वात छोटे गाव आहे. तरीही या गावाला पूर्वेकडून बायपास रस्ता (रिअलाईनमेंट) करण्यात येणार आहे. म्हणजे हे गाव आता हायवेवर नसेल. तर गेवराई तांडा गावापेक्षा मोठे असलेल्या गावांना मात्र, बायपास केलेले नाही. विशेष म्हणजे या गावात अतिक्रमणे नाहीत, वाहतूक कोंडी होणारे गाव नाही, फार गजबजलेलेही गाव नाही, तरीही या गावाला बायपास केले आहे.

औरंगाबाद पैठण चौपदरीकरण झाल्यावर गेवराई तांडा येथील बायपास देण्यात आला. यासाठी शासनाला दहा एकर जमीन अधिग्रहित करावी लागेल आणि पूर्वीच्याच रस्त्याने जर चार पदरीकरण झालं तर केवळ सहा एकर जमीन अधिग्रहित करावी लागते.


बायपासमुळे लांबी आणि खर्चही वाढणार
औरंगाबाद-पैठण हा रस्ता सध्या 100 फूट रुंद संपादित जागेत दोन पदरी आहे. आता चार पदरी करण्यासाठी अधिकची 50 फूट जागा संपादित करायची आहे. मात्र, जिथे बायपास करायचे आहेत, तिथे पूर्ण 150 फूट रुंद जागा संपादित करावी लागणार आहे. गेवराई तांड्यामधून जाणारा सध्याचा रस्ता सरळ आहे. इथे बायपास केल्यास रस्त्याची लांबी एक किलोमीटरने वाढेल. तसेच बायपास करण्यासाठी 10 हेक्टर जमीन संपादित करावी लागेल तर बायपास न करता गेवराई तांड्यातूनच रस्ता पुढे नेल्यास अवघे 10 हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. म्हणजे बायपासमुळे रस्त्याची लांबीही वाढणार आहे आणि पर्यायाने खर्चही वाढणार आहे.


धक्कादायक म्हणजे या रस्त्याच्या चौपदरीकरणाबाबत नोटिफिकेशन निघण्याच्या केवळ 15 दिवस आधी जमीन खरेदी करण्यात आली आहे. त्यापेक्षाही अधिक धक्कादायक म्हणजे भर उन्हाळ्यात आणि ऐन उष्णतेच्या लाटेत मोठमोठ्या आंब्याच्या फळझाडांची लागवड सुरू करण्यात आली आहे. कोणत्या गटातून हा रस्ता जाणार आहे, याची माहिती देणारे थ्री-ए नोटफिकेशन राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने 24 एप्रिल रोजी प्रकाशित केले. 


रस्त्यासाठी जमीन अधिग्रहित करत असताना जर झाडं आली तर त्याचा मावेजा देताना सध्या असलेलं झाडाचं वय आणि पुढे भविष्यात किती काळ याला फळं लागू शकतात आणि त्यावेळी त्याची किंमत काय असेल या सगळ्याचं संशोधन केलं जातं. अगदी असंच मावेजा देतांना ही झाडं नेमकी कधी लावली आहेत याचं देखील संशोधन केलं तर भविष्यात अशा प्रकारची शासनाची फसगत थांबेल.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha