Aurangabad News : औरंगाबाद महानगरपालिकेकडून (Aurangabad Municipal Corporation) श्वान (Dog) मालकांना महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यापुढे महापालिका हद्दीत असलेल्या प्रत्येक श्वान मालकाला आपल्या श्वानाचा परवाना (Dog License) काढावा लागणार आहे. अन्यथा महानगरपालिका अशा श्वानास जप्त करणार असून, संबंधित मालकावर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार असल्याचं महानगरपालिकेकडून सांगण्यात आले आहे. 


याबाबत काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व श्वान मालकांना कळविण्यात येते, मुंबई प्रांतिक महानगरपालिका, अधिनियम 1949 चे कलम 127 (2), (क) 457, (13) अन्वये महानगरपालिका हद्दत पाळीव श्वान बाळगण्यासाठी श्वान परवाना हस्तगत करणे बंधनकारक आहे. तरी सर्व संबधीतांनी तात्काळ महानगरपालिका पशुचिकीत्सालय बायजीपुरा येथुन (सुटीचे दिवस सोडून) श्वान परवानासाठी लागणारे कागदपत्रे सादर करून नवीन श्वान परवाना व नुतनीकरण करून श्वान परवाना हस्तगत करावा.


जर मालकांकडे परवाना नसल्यास पाळीव श्वान महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय अनाधिकृत पाळले असे गृहीत धरून विषेश मोहिमे अंतर्गत पाळीव श्वान नियम (11) अन्वये जप्त करण्यात येईल. तसेच विनापरवाना श्वान बाळगल्याचे दंड व परवाना शुल्क वसुल करण्यात येईल. याची सर्व श्वान मालकांनी याची गांर्भियाने नोंद घ्यावी, असे महानगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहेत. 


श्वान परवानासाठी लागणारे आवश्यक बाबी


श्वान परवाना नमुना अर्ज,पाळीव प्राण्यांचे दोन रंगीत फोटो (साईझ 5x7 से.मी) 
श्वान दंशक प्रतिबंधक रेबीज लस प्रमाणपत्र
श्वान परवाना फी 750 रुपये 
श्वान परवाना नुतनीकरण फी


श्वान परवाना मिळण्याचे ठिकाण


नागरिकांना आपल्या श्वानाचा परवाना मिळवण्यासाठी पशु चिकित्सालय येथून परवाना घ्यावा लागणार आहे. बायजीपुरा येथील महानगरपालिका पशु चिकित्सालय येथून सुट्टीचे दिवस सोडून सकाळी 800 ते 1.00 व दुपारी 3.00 ते 5.00 वाजेपर्यंत परवाना मिळवता येणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9421664514 व दूरध्वनी क्रमांक 0240-2301354 डॉग युनिट, बायजीपुरा येथे संपर्क साधावा असे आवाहन प्र. पशु वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे. 


मालकांनो महागडे श्वान सांभाळा...


औरंगाबाद शहरातील हजारो नागरिकांकडे महागडे श्वान आहेत.तर काहींकडे विदेशी श्वान देखील आहेत. मात्र, आता अशा मालकांना देखील आपल्या श्वानाचा परवाना काढावा लागणार आहे. लाखो रुपये खर्च करून श्वान सांभाळून देखील जर तुम्ही त्या श्वानाचा परवाना काढला नसल्यास महानगरपालिका तुमच्या श्वानाला जप्त करू शकते. त्यामुळे महागडे श्वान असलेल्या मालकांनी आपल्या श्वानाचा परवाना काढून घेतला पाहिजे,अन्यथा तुमचा देखील श्वान जप्त होऊ शकतो. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणीसंग्रहालयातील 'राजा' बिबट्याचा मृत्यू