औरंगाबाद : एखादी व्यक्ती आपपल्या घरात धार्मिक प्रार्थना करीत असेल, तर त्यामुळे इतरांच्या भावना कशा दुखावतील असा प्रश्र खंडपीठाने उपस्थित करत रेल्वे सुरक्षा दलातील अधिकाऱ्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad Bench) न्या. आर. जी. अवचट आणि न्या. संजय देशमुख यांनी हे आदेश दिले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात दोन समाजात तेढ निर्माण झाल्याचे सिद्ध होत नसल्याचे देखील खंडपीठाने स्पष्ट केले आहे. गेल्यावर्षी औरंगाबादच्या रल्वेस्टेशन परिसरातील सिल्क मिल्क कॉलनी भागातील रेल्वे सुरक्षा दलातील पोलिस निरीक्षक किशोर मलकूनाईक यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


काय आहे प्रकरण? 


मलकूनाईक यांच्या पत्नीचा वाढदिवस असल्याने 23 एप्रिल 2022  रोजी त्यांनी आपल्या घरात स्पीकरवर गाणे लावले होते. विशेष म्हणजे त्यांच्या घरात असलेल्या खिडकीच्या बाजूला एक मशीद आहे. त्यामुळे, मशिदीत अजानच्या वेळेत हनुमान चालिसा वाजविल्याचा आरोप मलकूनाईक यांच्यावर करत काही मुस्लीम नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे मलकुनाईक यांच्याविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 505 (1) (ब), 505 (क), 34 तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 37 (1) (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे, संबंधित गुन्हा रद्दसाठी मलकूनाईक यांनी अॅड. अमरजितसिंह गिरासे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती. मलकूनाईक यांनी शातंतेचा भंग केला, दोन समाजांत तेढ निर्माण होईल अशी कृती केली. इतरांच्या भावना दुखावतील असे काम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. संबंधित प्रकार उल्लेख केलेल्या स्वरूपाचा नसल्याची बाजू मलकूनाईक यांच्याकडून मांडण्यात आली. त्यानंतर खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. 


...तर इतरांच्या भावना कशा दुखावतील? 


दरम्यान दोन्ही बाजू समजून घेतल्यावर खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला आहे. तसेच एखादी व्यक्ती आपपल्या घरात धार्मिक प्रार्थना करीत असेल, तर त्यामुळे इतरांच्या भावना कशा दुखावतील असा प्रश्र खंडपीठाने केला. घरात प्रार्थना करण्याने दोन समाजांत तेढ निर्माण होत नाही असेही खंडपीठाने स्पष्ट करीत मलकूनाईक यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा रद्द केला.


राज ठाकरेंच्या सभेनंतर घडली घटना...


1 मे 2022 रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा झाली होती. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, मशिदीवरील भोंगे बंद न झाल्यास त्याच दिशेने आपले भोंगे लावून त्यात हनुमान चालीसा लावण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला होता. याच दरम्यान मलकूनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची घटना उघडकीस आली असल्याने यावरून राजकीय वातावरण देखील तापले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad : राजकीय हेतूने याचिका करणं पडलं महागात; न्यायालयाने ठोठावला 50 हजारांचा दंड