औरंगाबाद : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुन्हा एकदा दांडी मारली आहे. सलग चार वर्षे आमदार असताना आणि आता खासदार म्हणून निवडून आल्यानंतरही जलील यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं टाळलं आहे. खासदार इम्तियाज जलील सध्या मुंबईत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.


खरंतर हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला इम्तियाज जलील उपस्थित राहणार की नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियावर खासदार इम्तियाज जलील यांना विचारण्यात आला होता. याचं उत्तर न देता तुमच्याकडून देशभक्तीच्या प्रमाणपत्राची गरज नाही, अशा शब्दात प्रतिक्रिया देत इम्तियाज जलील यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

आज (17 सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते औरंगाबादमधील सिद्धार्थ उद्यानात ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात येणार आहे. शिष्टाचारानुसार या सोहळ्याला लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार उपस्थित राहणं अपेक्षित असतं. इम्तियाज जलील हे आमदार पदाच्या आपल्या कार्यकाळात या सोहळ्याला गैरहजर राहिल्यामुळे,  त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता. आता पुन्हा एकदा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून एका फेसबुक युझरने इम्तियाज जलील यांना या सोहळ्याला हजर राहून, रझाकारांची एमआयएम आणि आताची एमआयएम वेगळी असल्याचं दाखवून द्यावं, असं आवाहन करण्यात आलं होतं.



"माझ्या उपस्थिती किंवा अनुपस्थितीवरुन कुणी माझ्या देशभक्तीची तुलना करु नये, असे विचार डोक्यात येणे यातून संबंधिताची मानसिकता दिसून येते. देशभक्तीचं प्रमाणपत्र मला अशा मानसिकतेच्या लोकांकडून घेण्याची गरज नाही," अशा शब्दांत इम्तियाज जलील यांनी आपला संताप व्यक्त केला.

मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस रझाकारापासून मुक्तीचा मानला जातो. इतिहासातील एमआयएम हा पक्ष रझाकारांच्या बाजूचा होता, अशी टीका एमआयएमवर होते. त्यातच आता जलील यांनी कार्यक्रमाला दांडी मारुन, नव्या वादाला तोंड फुटलं आहे.