मुंबई : अंगारकी संकष्टीनिमित्त राज्यभर आज गणपती मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केली आहे. यावर्षी एकमेव अंगारकी संकष्टी असल्यामुळे भाविक मोठ्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहत होते. मुंबईचं आराध्य दैवत आणि लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात रात्रभर भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.


सिद्धिविनायक मंदिरात आज दिवसभरात 10 ते 12 लाख भाविक सिद्धिविनायकाचे दर्शन घेतील, असा अंदाज मंदिर प्रशासनाकडून वर्तवला जात आहे. अंगारकी संकष्टी ही गणेश भक्तांसाठी अतिशय महत्त्वाची असून तिला अनन्यसाधारण महत्त्व देखील आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी केवळ एकच अंगारकी संकष्टी असून पुढच्या वर्षी अंगारकी संकष्टी नाही. त्यामुळे गणेश भक्तांना आजच्या अंगारकी संकष्टीनंतर थेट 2021 च्या अंगारकी संकष्टीची वाट पाहावी लागणार आहे.


आजच्या दिवसाचे महत्त्व लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी देखील सिद्धिविनायक मंदिरात चोख पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जात आहे. मंदिराला देखील आकर्षक रोषणाईने सजविण्यात आलं आहे.


मुंबईप्रमाणे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती आणि रत्नागिरीतील गणपती पुळे येथेही गणेशभक्तांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येथेही भाविकांनी रात्रीपासून रांगा लावल्या आहेत. राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येथे आले आहेत.