औरंगाबादेत बछड्यांसोबत महापौरांचं फोटोसेशन वादाच्या भोवऱ्यात
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 13 Jan 2017 10:48 AM (IST)
औरंगाबाद : औरंगाबादचे महापौर भगवान घडामोडेंनी वाघाच्या बछड्यांना हातात घेत केलेलं फोटोसेशन वादात सापडलं आहे. सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या वाघाच्या बछड्यांच्या नामकरण सोहळ्यात घडामोडेंनी बछड्यांना कवेत घेतलं होतं. 12 नोव्हेंबरला औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात सृमद्धी वाघिणीनं एकूण 4 पिल्लांना जन्म दिला होता. मात्र त्यातील एक बछडा आधीच दगावल्यानं इतर तिघांची मोठ्या प्रमाणावर काळजी घेण्यात येत आहे. या बछड्यांच्या नामकरण सोहळ्याला महापौर भगवान घडामोडेंनी त्यांना उचलून फोटो काढले. हे फोटोशूट वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. हे फोटोसेशन नियमबाह्य असल्याचं बोललं जात आहे. या बछड्यांचं शक्ती, वीर आणि भक्ती असं नामकरण करण्यात आलं आहे.यातील एक बछडा पांढऱ्या रंगाचा आहे.