मुंबई : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


विजय चव्हाण यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा दुपारी 12 वाजल्यापासून त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.

विजय चव्हाण यांच्या रुपाने मराठी चित्रपट, नाटक आणि मालिका या तिन्ही माध्यमांना गेली 40 वर्षे व्यापून टाकणारा अष्टपैलू अभिनेता महाराष्ट्राच्या कलाविश्वाने गमावला आहे.

विजय चव्हाण यांचं बालपण मुंबईतील करीरोडच्या गिरणगाव भागात गेले. शालेय शिक्षण दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. त्यानंतर रुपारेल कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली.

विजय चव्हाण यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात रंगभूमीवरुन केली. पुढे अनेक चित्रपट आणि मालिकाही केल्या. विनोदी अभिनेता म्हणून त्यांना अवघे मराठी रसिक ओळखतातच, मात्र त्याचसोबत त्यांच्या गंभीर भूमिकाही गाजल्या. विनोदाचं उत्तम टायमिंग विजय चव्हाण यांना होतं.

गेले काही दिवस विजय चव्हाण हे आजारी होते. काही महिन्यांपूर्वीही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आजारावर मात करत, ते घरी परतले होते. यावेळी मात्र विजय चव्हाण मृत्यूशी झुंज हरले.

विजय चव्हाण यांचा जन्म मुंबईतील लालबागमध्ये झाला होता. भारतमाता चित्रपटगृहाच्या मागे असलेल्या हाजी कासम चाळीत ते लहानाचे मोठे झाले. दादरच्या इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाल्यावर विजय चव्हाणांनी रुपारेल कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक एकांकिकांमध्ये भाग घेतला होता. विजय कदम, विजय चव्हाण आणि एक मित्र या तिघांनी मिळून 'रंगतरंग' नावाची नाट्यसंस्था सुरु केली. त्यानंतर त्यांची लक्ष्मीकांत बेर्डेंशी ओळख झाली. त्या वेळी पुरुषोत्तम बेर्डे 'टूरटूर' नाटक करत होते. लक्ष्मीकांत बेर्डेंनी त्यांना विजय चव्हाणांचं नाव सुचवलं.

चित्रपट, नाटक आणि मालिकांमधील कारकीर्द

कशात काय लफड्यात पाय, कशी मी राहू तशीच, कार्टी प्रेमात पडली, खॊली नं. 5, झिलग्यांची खोली, जाऊ बाई हळू, टुरटूर, देखणी बायको दुसऱ्याची, बाबांची गर्लफ्रेंड, मोरूची मावशी, हयवदन, श्रीमंत दामोदरपंत यांसारखी अनेक नाटकं विजय चव्हाण यांच्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रचंड लोकप्रिय झाली.

संबंधित बातमी : 'मोरुची मावशी' विजय चव्हाण यांची कारकीर्द

सिनेमा क्षेत्रातही त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी सिनेसृष्टीचा मोठा कालावधी विजय चव्हाण यांनी पाहिला, त्यातील बदल पाहिले आणि त्यात बहुमूल्य योगदानही दिले. जत्रा, छकुला, अशी असावी सासू, आली लहर केला कहर, घोळात घोळ यांसारख्य तिनशेहून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.

असे पाहुणे येती, माहेरची साडी, येऊ का घरात, रानफूल, लाइफ मेंबर यांसारख्या मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या.


सन्मान


महाराष्ट्र सरकारचा ‘चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव’ पुरस्काराने यंदा अभिनेते विजय चव्हाण यांचा गौरव झाला होता.

आजवर विविध संस्थांनी त्यांच्या अभिनयाचा गौरव केला आहे. ‘अशी असावी सासू'मधील भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आणि स्क्रीन पुरस्कार त्यांना मिळाला होता. 2017 सालच्या ‘संस्कृती कलादर्पण’च्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते.

VIDEO (संग्रहित) : अभिनेते विजय चव्हाण यांना चित्रपती 'व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झाला, त्यावेळी एबीपी माझाने त्यांची मुलाखत घेतली होती.