औरंगाबाद : औरंगाबादमध्ये सातारा परिसरातील छत्रपतीनगरमध्ये एका बँक अधिकाऱ्याचा घरात घुसून खून केल्याची घटना घडली आहे. जितेंद्र नारायण होळकर (वय 47 वर्ष) असं बँक अधिकाऱ्याचं नाव आहे. जितेंद्र हे शेकटा मध्यवर्ती बँकेत व्यवस्थापक पदावर काम करत होते.


जितेंद्र होळकर हे 15 वर्षीय मुलगा आणि पत्नीसह राहत होते. होळकर कुटुंबीय शुक्रवारी जेवण करुन रात्री 11 वाजता झोपलं होतं. हत्या झाली तेव्हा जितेंद्र होळकर घरातील एका खोलीत तर पत्नी आणि मुलगा दुसऱ्या खोलीत झोपले होते.

मात्र रात्री अडीचच्या सुमारास जितेंद्र होळकर यांच्या खोलीतून आवाज आल्यानंतर त्यांच्या पत्नी तिथे गेल्या असता, होळकर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. यानंतर त्यांनी फोन करुन शेजाऱ्यांना सांगितलं.

हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मारेकऱ्यांनी आधी दोरीने होळकरांचा गळा आवळला आणि नंतर गळा चिरला, अशी माहिती पोलिसांनी दिली.