कोल्हापूर : सेवानिवृत्त होण्यास केवळ दोन तास राहिलेले असतानाच लाच स्वीकारताना वनविभागातील लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सातपुतेला 1500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं आहे.
सदाशिव ज्ञानदेव सातपुते हा लेखापाल आज संध्याकाळी सेवानिवृत्त होणार होता. कार्यालयातून जाताजाता हाथ मारुन जाण्याच्या तयारीत असणाऱ्या या सातपुतेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1500 रुपयांची लाच स्वीकारताना रंगे हाथ पकडलं आहे.
शाहूवाडीतील तक्रारदार हे जमिनीच्या खरेदी विक्रीचा व्यवहार करतात, त्यांना शाहूवाडीतील जमीन खरेदी करायची होता. मात्र ही जमीन इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे का? हे पाहण्यासाठी त्यांनी उपवनविभाग कार्यालयात अर्ज केला होता. 15 दिवस पाठपुरावा केला, मात्र त्यांना त्या संदर्भातील प्रमाणपत्र देण्यास सातपुतेंने टाळाटाळ केली होती. हे प्रमाणपत्र देण्यासाठी सातपुते याने 2000 रुपयांची लाच मागितली होती. या संदर्भातील तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली, आज दुपार सापळा रचून लेखापाल सदाशिव ज्ञानदेव सातपुते याला 1500 रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलं.
दुदैवाची बाब म्हणजे अवघ्या दोन तसातच सातपुते हा सेवा निवृत्त होणार होता. कोल्हापुरातील उपवनविभागात अशा प्रकारची कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली.