औरंगाबाद : फिल्मी स्टाईलनं लोकांनी फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला औरंगाबाद पोलिसांनी अटक केली आहे. कारवाल्यांना लुटणारा हा चोरटा आता जेलची हवा खात आहे. या भामट्यानं आतापर्यंत औरंगाबादच्या 30 जणांोना सावज केलं आहे.


चंद्रकात लाळवे चाकूचा धाक दाखवून लोकांच्या खिशातले पैसे हिसकावायचा. त्यासाठी त्याची युक्तीही भन्नाट होती. एखाद्या ऑफिससमोर उभं राहायचं आणि कुणी एकटा कारमधून निघाला की, एखाद्या चौकात त्याला गाठून मी आपल्याला कसा ओळखतो हे पटवून सांगायचं.

एकदा का गाडीत बसलं की चाकूचा धाक दाखवून चालकाकडचे पैसे हिसकवायचे. सीए असलेल्या अशोक राठींनी पोलिसात तक्रार केली आणि चंद्रकात लाळवेला गजाआड केलं. उच्चभ्रू लोकांना धाक दाखवून लुटल्यावरही त्यांनी आजवर तक्रार न केल्यानं चंद्रकांतचा धंदा जोरात सुरु होता.

धमकावून पैसे मिळवण्याची चटक चंद्रकांत लाळवेला लागली, मात्र पैसे मिळवण्याचा असा शॉर्टकट फार काळ टिकत नाही, हे आता चंद्रकांतला चांगलंच कळलं असेल.