निर्माते अतुल तापकीर आत्महत्येप्रकरणी पत्नीला अटक!
एबीपी माझा वेब टीम | 16 May 2017 03:49 PM (IST)
पुणे : चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या आत्महत्येप्रकरणी पत्नीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अतुल तापकीर यांची पत्नी प्रियांका, तिचा मावसभाऊ आणि दोन मानलेल्या भावांना बेड्या ठोकल्या आहेत. अतुल तापकीर यांनी शनिवारी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. पुण्यातील हॉटेल प्रेसिंडेटमध्ये विष पिऊन त्यांनी जीवन संपवलं. अतुल तापकीर हे 'ढोल ताशा' चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांची पुण्यात आत्महत्या अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये पत्नीवर आरोप करण्यात आले आहेत. 'ढोल ताशा' सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियांकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला मानसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी लिहिली आहे. यानंतर पत्नी प्रियांकावर डेक्कन पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आज ती स्वत:हून डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये हजर झाली. यानंतर तिच्यासह चार जणांना पोलिसांनी आज अटक केली. त्यांना आज पुणे कोर्टात हजर करणार आहेत. अतुल तापकीर आत्महत्या : पुण्यातील 'त्या' पोलिसांची चौकशी!