अहमदनगर : आध्यात्मिक गुरु भय्युजी महाराज यांच्यावर दोन वेळा प्राणघातक हल्ला झाल्याची तक्रार त्यांच्या चालकानं दाखल केली आहे. या हल्ल्यामध्ये भय्यूजी महाराज सुखरुप असून त्यांच्या कारचालक आणि सहकाऱ्यांना इजा झाल्याची माहिती आहे.


 
तक्रारीतील माहितीनुसार रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भय्युजी महाराज पुण्याहून इंदूरच्या दिशेने निघाले. पण पुणे जिल्ह्यातल्या रांजणगावजवळ एका कारने भय्युजी महाराज यांचा रस्ता अडवला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली.

 
जेव्हा भय्युजी महाराज यांचे चालक जाब विचारण्यासाठी गाडीतून उतरले, तेव्हा रस्त्याशेजारीच असलेल्या दुकानांमधून काही तरुण हत्यारांसह चाल करुन आले. त्यांनी चालकाला मारहाण केली. भय्युजी महाराज कारमधून उतरल्यानंतर त्या तरुणांनी त्यांच्यावरही
हल्ल्याचा प्रयत्न केला, पण त्यांना चालक आणि सोबत असलेल्या सहाय्यकांनी वाचवलं आणि तिथून निघण्यात ते यशस्वी झाले.

 
त्यानंतर गाडी जेव्हा मनमाडजवळ पोहोचली, तेव्हा तिथेही काही तरुणांनी गाड्या आडव्या लावून भय्यूजी महाराज यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. पण चालकानं प्रसंगावधान राखत गाडी रस्त्याच्या कडेने काढली आणि सर्वजण सुखरुप इंदूरला पोहोचले.

 
गेल्या 48 तासात या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. पण इंदूरमध्ये पोहोचल्यानंतर भय्यूजी महाराज यांच्या वाहनचालकानं रांजणगाव पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे.