बुलडाणा : बुलडाणा येथील तीन युवक शॉपिंगसाठी मुंबईला गेले असता त्यांच्याजवळील पैसे संपले म्हणून त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबून एका विक्रीकर अधिकाऱ्यावर चाकूने वार करत हल्ला केला. या अधिकाऱ्याच्या जवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन पसार झाले. या अधिकाऱ्याच्या मोबाईल लोकेशन वरून तिन्ही आरोपींना बुलडाणा शहर पोलिसांच्या डीबी पथकाने ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा येथील अमित सुनील बेंडवाल, आबिद खान अयुब खान उर्फ ऑल, अदनान कुरेशी वहीद कुरेशी उर्फ बब्या हे तिघे शॉपिंगसाठी मुंबईला गेले होते. यापैकी एका जवळचं पाकीट हरवलं. पैसे नसल्याने त्यांनी 22 ऑक्टोबर रोजी रात्री 7:30 वाजेच्या सुमारास सीबीडी सर्कल जॉगिंग ट्रॅकजवळ बेलापूर नवी मुंबई येथे रस्त्याने पायी जात असलेल्या विक्रीकर अधिकारी महेश मधुकर बिनवडे यांच्यावर अचानकपणे चाकूहल्ला केला. त्यांना जखमी करत त्यांच्याजवळील मोबाईल व नगदी 8 हजार रुपये घेऊन तिघे फरार झाले.
या हल्ल्यात महेश बिनवडे यांचा गळा चिरला गेल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आगे. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. बिनवडे यांच्या मोबाईलचं लोकेशन घेतलं असता तो मुंबई येथे दिसला. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन विचारपूस केल्यावर बुलडाणा येथील आरोपींनी गुन्हा केल्याचे समोर आले.
याची माहिती बुलडाणा शहर ठानेदार प्रदीप साळुंखे यांना देण्यात आली. शहर डीबी स्कॉडचे शिवाजी मोरे, दत्ता नागरे व संदीप कायंदे यांनी बुलडाणा येथील आरोपी अमित बेंडवाल, आबिद खान व अदनान कुरेशी या तिघांना ताब्यात घेतले. काल बेलापूर पोलीस बुलडाणा शहरात दाखल झाले. तिन्ही आरोपींना त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणात मुंबईतील दोन आरोपींचा समावेश असल्याची माहिती शहर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी दिली आहे. यातील आरोपी अमित बेंडवालवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचेही ते म्हणाले.