बीड : जिल्ह्यातील धारुर तालुक्यात कोथिंबीरवाडी येथील दलित कुटुंबावर शेतीत काम करत असताना शेजाऱ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. पीडित कुटुंबातील ९ जणांना मारहाण करण्यात आली. या मारहाण प्रकरणानंतर दिंद्रुड पोलिसांत ॲट्रॉसिटीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


कोथिंबीरवाडी येथील शेतकरी बाळासाहेब रोहिदास उजगरे हे शेतीत काम करत होते. यावेळी शेजारच्या अजय भानुदास तिडके व सिद्धेश्वर भानुदास तिडके यांनी उजगरेंच्या शेतात दगडे टाकण्यास सुरुवात केली. यावेळी बाळासाहेब उजगरे यांनी दगडे टाकण्यास विरोध केला. या विरोधानंतर प्रकरण मारामारीपर्यंत गेले. पीडित उजगरे कुटुंबातील व्यक्तींना 8 जणांनी मिळून मारहाण केली.


मारहाण होत असताना उजगरेंची पत्नी हल्लेखोरांना विनवण्या करत असतानाही त्यांना कोणतीच दया मया दाखवली नाही. जातीवाचक शिविगाळ करत लाठ्या काठ्या व दगडाने उजगरे कुटुंबातील ९ जणांना मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 


या मारहाणीत बाळासाहेब उजगरे, शकुंतला उजगरे व निखिल उजगरे जखमी झाले. जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दिंद्रुड पोलीस स्टेशनमध्ये काल शुक्रवारी रात्री बाळासाहेब उजगरे यांच्या फिर्यादीवरून 9 जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 


हे ही वाचलं का ?