अहमदनगर : अहमदनगरच्या श्रीगोंद्यात तमाशात नाचण्यावरुन तुफान हाणामारी झाली आहे. ‘शांताबाई’ या गाण्यावर नाचण्यासाठी दोन राजकीय गटात झालेल्या हाणामारीत चक्क तलवारी काढण्यात आल्या. या मारहाणीत सतीश म्हस्के आणि किरण म्हस्के गटाचे दहा जण जखमी झाले असून तिघांची तब्येत गंभीर आहे.
चांडगावला भैरवनाथच्या यात्रेनिमित्त गावात तमाशाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी शांताबाईचं गाणं सुरु झाल्यावर काही तरुणांनी ठेका धरला. त्यावेळी पाठीमागून नाचणाऱ्या तरुणांना विरोध सुरु झाला आणि दगडफेक सुरु झाली. त्यानंतर तलवार आणि काठीनं मारहाण सुरु झाली.
या सर्व प्रकारामुळे प्रचंड गोंधळ उडाल्यानं नागरिक सैरभैर पळू लागले, तर काहींनी ट्रक आणि कलावंतांच्या तंबूचा आसरा घेतला.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. या मारहाणीमागं ग्रामपंचायत निवडणुकीचा वाद असल्याचं बोललं जात आहे.