एकाच वेळी एक हजार किलो पोहे बनविले , विश्वविक्रमाचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 29 Dec 2018 04:46 PM (IST)
अकोल्यातील पत्रकार निरज आवंडेकर यांनी हा उपक्रम केला आहे. कालपासून शहरातील शास्त्री मैदानावर सुरू झालेल्या मोर्णा सांस्कृतिक महोत्सावात हे पोहे बनविण्यात आले.
अकोला : अकोल्यात एकाच कढईत एक हजार किलो पोहे बनवण्याचा विक्रम करण्यात आला आहे. अकोल्यातील पत्रकार निरज आवंडेकर यांनी हा उपक्रम केला आहे. कालपासून शहरातील शास्त्री मैदानावर सुरू झालेल्या मोर्णा सांस्कृतिक महोत्सावात हे पोहे बनविण्यात आले. या पोह्यांचं वाटप अकोलेकरांसह सकाळी चित्रकला स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे. आज अकोल्याचा पारा 5.9 अंशांवर होता. मात्र हुडहुडी भरवणाऱ्या या थंडीतही अकोलेकरांनी पोह्यांचा आस्वाद घेण्यासाठी शहरातील शास्त्री स्टेडियमवर गर्दी केली होती. मैदानावर दहा बाय दहाच्या भल्या मोठ्या कढईत हे पोहे बनविण्यात आलेत. या उपक्रमासाठी निरज आवंडेकर यांनी कालपासूनच तयारी सुरू केली होती. आतापर्यंत पोहे बनविण्यासंदर्भात कोणत्याच विक्रमाची नोंद नसल्याचं आयोजकांचा दावा आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ते विश्वविक्रमाचा दावा लिम्का बुकसह गिनिज बुककडे करणार आहे.