नागपूर : नागपूरच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँकेत असिस्टंट मॅनेजर पदावर काम करणाऱ्या 34 वर्षीय वृषाली हावरे यांनी आत्महत्या केली. भारत नगरमधील राहत्या घरी बुधवारी रात्री त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घरगुती कारणावरुन वृषाली हावरे यांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. आतापर्यंतच्या तपासाच्या आधारे पोलिसांनी मयत वृषाली हावरे यांचे पती आशुतोष हावरेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

"वृषालीने आयुष्य संपवलं त्यावेळी मी घरी नव्हतो. घरी परतल्यानंतर दरवाजा आतून बंद होता, असं आशुतोष हावरेने सांगितलं. त्यानंतर आशुतोष दरवाजा तोडून आत गेले, त्यावेळी त्यांनी वृषाली हावरेंना मृतावस्थेत पाहिलं. आशुतोष यांनी शेजाऱ्यांना माहिती दिली. नंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवलं.

पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून वृषाली हावरे यांचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. तसंच घटनास्थळावर सुसाईड नोट सापडली नाही, असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

वृषाली आणि केमिकल इंजिनिअर असलेल्या आशुतोषचा तीन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. 2015 मध्ये आशुतोषच्या पालकांनी मुंबईतील लेक्चररचा जॉब सोडून नागपूरमध्ये शिफ्ट होण्यासाठी दबाव आणला. परंतु इथे आल्यावर तो बेरोजगारच राहिला. त्यानंतर तो सातत्याने वृषाली यांच्याकडे पैशांची मागणी करत असे.