भिवंडी : रस्ते, बरोजगारी, पक्षांतर करणारे नेते, पीएमसी बँक आणि सिटी को. ऑप बँकेतील घोटाळ्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला. आज राज ठाकरेंची भिवंडीत प्रचारसभा पार पडली. सिटी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेने माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचं नावही राज ठाकरेंनी यावेळी घेतलं.


काही विशिष्ट माणसं सत्तेत निवडून आली तर त्यांना भीती राहणार नाही. आपण काम नाही केलं तरी लोक आपल्याला निवडून देणार, असा समज त्यांचा झाला आहे. विरोधी पक्षात असलेले नेतेच आज सत्ताधारी गोटात जाऊन बसले आहेत. त्यामुळे पक्षांतर करणारे नेते पराभूत होणार नाहीत, तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.


पीएमसी आणि सिटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. खातेदारांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता येत नाहीयेत. बँका बुडत आहेत, उद्योग बुडत आहेत, तरीही नागरिक गप्प का आहेत, असा सवाल राज ठाकरेंनी विचारला. शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ सिटी कॉऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत. मात्र सिटी बँक बुडल्यानंतर खातेदारांनी अडसूळ यांची भेट घेतली. त्यावेळी अडसूळांनी 'मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा', असं उत्तर खातेदारांना दिलं असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.


राज्यातील खड्ड्यांचा मुद्दाही राज ठाकरेंनी पुन्हा उपस्थित केला. आज महाराष्ट्रात नाशिक वगळता उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र खड्डे आहेत. नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती त्यावेळी आम्ही टक्केवारी बंद केली. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे नाही पडले. याच कंत्राटदारांनी नाशिकमध्ये आमच्या काळात चांगले रस्ते बांधले कारण आम्ही टक्केवारी बंद केली, असा दावा राज ठाकरेंनी केला.


राज्य सरकार 30 % सरकारी कर्मचाऱ्यांची कपात करणार असल्याची माहिती समोर येत आहे. उद्योगधंदे बंद होत आहेत आणि सरकारी नोकऱ्याही कमी होत आहेत. आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला.