Sudhir Mungantiwar : राज्यात काँग्रेस पक्षाला (Congress) आणखी एक जबर धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत काँग्रेसला निरोप दिला आहे. त्यानंतर ते लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. तसेच त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेऊन चर्चाही केली. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील अद्याप उघड झालेला नाही. परंतु, या सगळ्या घडामोडी पाहता अशोक चव्हाण भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच आगे आगे देखिए, होता है क्या, असे सूचक वक्तव्य केले आहे. अशातच राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आपली प्रतिकिया दिली आहे.
काँग्रेस नेतृत्वाला कंटाळून पक्षाला रामराम
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेस मधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या मागील कारण म्हणजे काँग्रेसचे ज्या पद्धतीचे अंतर्गत राजकारण आहे, त्या राजकारणाला कंटाळून देशातील अनेक काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा साथ सोडून जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, देशात जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करणारा नेता, देशाचे तुकडे व्हावे असे म्हणणाऱ्याला आपल्या मांडीवर बसवणारा नेता, अशा नेत्याच्या विरोधातले वातावरण सध्या देशामध्ये आहे. त्यामुळे काँग्रेस मधील सध्याचे अनेक मोठे नेते हे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाला कंटाळून आणि देशाच्या संदर्भातील त्याचा भूमिकेला कंटाळून बाहेर पडत आहे. अशोक चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे. त्यामुळे ते पुढे भाजपमध्ये कधी प्रवेश करतील याचे उत्तर ते स्वताच देऊ शकतील, असे देखील मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
कुठे जातात याबाबत उत्सुकता
काँग्रेस नेतृत्वाला कंटाळून काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ आणि मातब्बर नेत्यांनी काँग्रेसला राम राम केला आहे. तर काही त्या वाटेवर आहेत. त्यातील काही जण कदाचित भाजपमध्ये प्रवेश करतील, तर काही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील. महाराष्ट्र राज्यातील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे काही वेळ आपण वाट पाहू. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. ते भाजपमध्ये प्रवेश करतात की, अन्य कुठे जातात ही उत्सुकता तुमच्याप्रमाणे मला देखील असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.