जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारकडून करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाच्या सर्वेक्षणाचा अहवाल 15 फेब्रुवारीला सादर केला जाण्याची शक्यता आहे. तसेच, 16 किंवा 17 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन बोलावल्या जाण्याची सुद्धा शक्यता असून, यावेळी वेगळ्या आरक्षणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. मात्र, यावरच आता मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रतिक्रिया आली असून, सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणी झाल्याशिवाय आमचं उपोषण सुटणार नसल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तसेच, सरकार डोके बिघडल्यासारखं बोलत आहेत, असेही जरांगे म्हणाले आहेत.
सरकारला आम्ही सगेसोयरे अध्यादेशाच्या अंमलबजावणी बाबत बोलत आहोत. ओबीसी आरक्षणाबाबत बोलतोय. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहे त्यांच्यासह सर्व कुटुंबाला आरक्षण द्यायचं यासाठीच अध्यादेश काढण्यात आले. त्यामुळे या अध्यदेशासाठी किंवा त्याच्या अंमलबजावणीसाठी आम्ही अधिवेशन बोलावत असल्याचं सरकारनं म्हटलं पाहिजे. मात्र, डोकं बिघडल्यासारखं आम्ही वेगळे देणार असल्याचे सरकार बोलत आहेत. आम्ही कधी म्हणलो वेगळ आरक्षण देऊ नका. पण, सगेसोयरे अध्यादेशावर देखील बोला. तुम्ही जरी वेगळं आरक्षण दिलं तरी सगेसोयरे अध्यादेशाची अमलबजावणी झाल्याशिवाय हे उपोषण सुटणार नाही असा थेट इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
अन्यथा मराठ्यांचे पुन्हा हाल होणार
मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे सगेसोयरे अध्यादेशाच्या अमलबजावणीसाठी पुन्हा उपोषण सुरु केले असून, त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, "सरकारने मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला पाहिजे. तसेच हा अहवाल स्वीकारून त्याचा कायदा केल्याशिवाय ते न्यायालयात टिकणार नाही. तसेच ओपन कोर्टात याबाबत सुनावणी झाल्यास हे आरक्षण तिथे टिकणार आहे. अन्यथा मराठ्यांचे पुन्हा हाल होणार आहे. मात्र, त्यासोबतच राज्यात मराठ्यांचे कुणबी नोंदी सापडल्या असून, त्यानुसारच ओबीसीमधून आरक्षण देण्यात यावं. आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण देऊ नका असे म्हणणारे जास्तीत जास्त हजार-दीड हजार लोक आहेत. त्यामुळे एवढ्या लोकांसाठी सरकारने हट्ट धरू नाही. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून सगेसोयराचा अध्यादेशानुसार कायदा पारित करावा. गेल्या तीन-चार दिवसांपासून आम्ही सरकारला सांगत आहोत की, विशेष अधिवेशन बोलवा, असे जरांगे म्हणाले.
सरकार सगेसोयरे अध्यादेशावर बोलायलाच तयार नाही
तर पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की, “14 किंवा 15 फेब्रुवारीला विशेष अधिवेशन असणार असल्याची माहिती माध्यमांमधून कळाली. तसेच या अधिवेशनातून वेगळं आरक्षण देणार असल्याचा देखील कळाले. पण वेगळा अधिवेशन कशासाठी देता. आम्ही तुम्हाला सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करा असे सांगत असताना, तुम्ही आम्हाला परत परत तेच सांगता. आमचं उपोषण सुरू आहे सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी, तसेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून न्यायालयातून टिकणार आरक्षण देण्याच्या मागणीसाठी. मात्र, तुम्ही आमच्या सगेसोयरे अध्यादेशावर बोलायलाच तयार नाही. तुम्हाला सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी याबाबत शब्द दिला आहे. त्यामुळे त्याचा अपमान होऊ देऊ नका आणि त्याशिवाय उपोषण सुटणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.
सारथीच्या विद्यार्थ्यांवर जरांगे भडकले
मनोज जरांगे यांचे आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु आहे. याचवेळी याच ठिकाणी सारथीच्या विद्यार्थ्यांनी देखील आपलं वेगळ उपोषण सुरु केले आहे. त्यामुळे सारथीच्या विद्यार्थ्यांवर जरांगे चांगलेच भडकले. "स्वतंत्र उपोषण कशासाठी करत आहात. तुमचा मुद्दा वेगळा, आरक्षणाबाबत बोलले पाहिजे. पीएचडी केली म्हणून हुशार झालात का?, गरीब मराठ्यांच्याबाबत तुम्ही काहीच बोलत नाहीत. आरक्षण मिळाल्यावर चांगलं होईल की पीएचडी केल्यावर चांगलं होईल?," असा सवाल जरांगे यांनी विचारला.
इतर महत्वाच्या बातम्या :
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास दिला नकार; उपोषणाचा आजचा तिसरा दिवस