Ashok chavan resignation news :  अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केले आहे. काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. देवेंद्र फडणवीस काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते संपर्कात असल्याचं समोर आले आहे. 
 
अशोक चव्हाण भाजपमध्ये येत आहेत, हे तुमच्याकडूनच ऐकतोय. पण काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.  


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
भाजपसोबत अनेक पक्षातील बडे नेते येण्यासाठी इच्छुक आहेत. विशेषत: काँग्रेसमधील अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. काँग्रेसमधील गटबाजी आणि अंतर्गत राजकारणाला नेते कंटाळले आहेत. काँग्रेसमधील मुस्कटदाबी आणि मोदींच्या नेतृत्त्वातील भारताची प्रगती पाहता, अनेक नेत्यांना वाटतं की मुख्य प्रवाहात यायला हवं. त्यामुळे आमच्या कोण कोण संपर्कात आहेत, भाजपमध्ये कोण कोण येणार याबाबत मी इतकंच सांगेन, आगे आगे देखीए, होता है क्या!


महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षातील नेते आमच्या संपर्कात आहेत. काही लोकांना यायचं आहे, ते येत आहेत. मोदींजीसोबत, भाजपसोबत यायला हवं, ही त्यांची भावना झालेली आहे. काँग्रेसचे अनेक नेते संपर्कात आहेत. गेली काही वर्ष काँग्रेस जी वाटचाल करतोय, त्यामुळे अनेकांची घुसमट होतेय. 'आगे आगे देखिए होता है क्या' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


पंकजा नेत्या राष्ट्रीय नेत्या आहेत, त्यांचं अंडरस्टँडिंग पक्कं आहे. त्यांच्या भाषणातील एक-दोन वाक्ये काढून मीडिया दाखवतो. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता, आहे आणि पुढेही राहील, असं फडणवीसांनी सांगितलं. बिहारमध्ये नेमकं काय चाललंय याची मला माहिती नाही. मी आधी भाजपचा प्रभारी होतो, आता नाही. अलिकडच्या काळात उद्धवजी जे बोलतायत, ते फार गांभीर्याने घेऊ शकत नाही. कालच मी त्यांना शुभेच्छा दिल्यात, गेट वेल सून.


काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या वाटेवर ?


अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायाकांचाही फोन नॉट रिचेबल आहे.  14 फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधील मराठवाड्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजले होते. नांदेडधाराशिव, पश्चीम महाराष्ट्रातील मोठे काँग्रेस नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं समोर आलेय.


काँग्रेसला मोठा धक्का -


अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.