मुंबई : मराठा आरक्षणाला काँग्रेसचा पाठिंबा असून त्यासाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. आता आरक्षणाबाबत चर्चा नको, तर कृती हवी असंही अशोक चव्हाण म्हणाले.

‘आजवर आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली आहेत. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही, ’ असं म्हणत अशोक चव्हाणांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

आंदोलकांना आवाहन

‘मराठा समाजाने राज्यभरात 58 मोर्चे शांततेत काढले. यापुढेही सर्वसामान्य जनतेला त्रास होईल, असं वर्तन न करता आंदोलन शांततेतच करावं,’ असं आवाहन अशोक चव्हाणांनी मोर्चेकऱ्यांना केलं.

मुख्यमंत्र्यांनी बेताल वक्तव्य थांबवावीत

‘मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनीही बेताल वक्तव्य करणं थांबवावं. मराठा समाज विरूद्ध इतर समाज असं चित्र तयार करुन मराठा समाजाला एकटं पाडण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे,’ असा गंभीर आरोप चव्हाणांनी केला. तसंच बेताल वक्तव्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

आत्महत्येच्या घटना टाळता आल्या असत्या

‘काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने आंदोलनादरम्यान आपला जीव दिला. ही घटना सरकारला टाळता आली असती. जगन्नाथ सोनावणे यांनी विष पिऊन केलेली आत्महत्याही दुदैवी आहे,’ असं चव्हाणांनी म्हटलं आहे.

आधी पुरावे द्या, मग आरोप करा

‘आंदोलन चिघळवण्यात जर विरोधक सहभागी असतील तर सरकारने पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं आणि मग कारवाई करावी,’ असं म्हणत अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं.