Ashok Chavan Nanded : महायुतीतील मित्रपक्षांसह विरोधकांकडून मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर सभेत खंत व्यक्त केली आहे. नांदेडच्या हिमायतनगर येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त केली. नांदेडमध्ये अशोक चव्हाण विरुद्ध इतर सर्व अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच पक्ष स्वबळावर लढत आहेत. पण मला विश्वास आहे की जनता मला या चक्रव्यूहातून बाहेर काढेल, असेही अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यावर टीका केली. हे माझ्या नावाने बोंबलत फिरतात. माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप लागत नाही, असेही ते म्हणाले.
पाणी पाजण्याचं काम तुमचंच आहे, गुलाबराव पाटलांना चव्हाणांचा टोला
भाजपच्या जाहीर सभेतून अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्यावर टीका केली. हे माझ्या नावाने बोंबलत फिरतात. माझं नाव घेतल्याशिवाय यांना झोप लागत नाही, अशी टीका चव्हाण यांनी दोन्ही नेत्यांवर केली. दरम्यान, मुदखेड येथील शिवसेना (शिंदे गट) सभेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी शहरातील पाणीपुरवठ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले, की, पाणी पाजण्याचं काम तुमचंच आहे. जिल्ह्यात ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत तुम्ही किती कामे केली? राज्यात ही कामे रखडली आहेत. प्रचार संपल्यानंतर तरी कृपा करून लोकांना पाणी पाजण्याचं काम करा, असा टोला अशोक चव्हाण यांनी पाटील यांना लगावला.
नेमकं काय म्हणाले होते हेमंत पाटील?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या नगरपंचायत आणि नगरपरिषदांच्या निवडणुका सुरु आहेत. याच निवडणुकांवरुन राजकीय नेते आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच महायुतीत ठिणगी पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नांदेडमध्येही राजकीय वातावरण चांगलच गरम झाल्याचं पाहायला मिळालं. नांदेड जिल्हयात सगळे पक्ष आपल्या मर्जीने चालावे ही अशोक चव्हाण यांची भूमिका आहे. पैशांचा वापर करुन कार्यकर्त्यांची जमात नष्ट करण्याचा त्यांचा जुना प्रयोग असल्याची टीता आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर केली. अशोक चव्हाण यांनीच युती तोडली, युती तुटण्यास तेच 100 टक्के जबाबदार आहेत असेही ते म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या: