Uddhav Thackeray: निवडणुकांच्या तोंडावर पैशाची उधळण होत असून हा सत्तेचा माज आहे. भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याची सडकून टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. “मतांचा लिलाव सुरू आहे का?” असा थेट प्रश्न उपस्थित करत त्यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणुकीत पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत. “हा पैसा येतो कुठून? याचं उत्तर कोणाकडेच नसल्याचे ते म्हणाले. “एक प्रकारचा सत्तेचा माज, सत्तेचा दर्प या राज्यकर्त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे”, अशा शब्दात त्यांनी हल्ला चढवला. ते म्हणाले की, आज एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जात नाही, नागरिकांशी संवाद साधत नाही. “ना शेतकऱ्यांचं ऐकणारे, ना शहरातील नागरिकांचा आवाज ऐकणारे हे असल्याचे ते म्हणाले.
हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक
मुंबईमध्ये गेले दोन-तीन वर्षे प्रदूषण असह्य झाले असून शहराच्या हवेत माणसाच्या आरोग्याला घातक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. हे प्रदूषण फक्त धूळ-धूराचं नसून, “हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे, त्यातून उठलेले भ्रष्टाचाराचे ढग संपूर्ण महाराष्ट्रावर घोंगावत आहेत,” असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “मी मुख्यमंत्री झालो तेव्हा आरे कारशेडला तत्काळ स्थगिती दिली होती. पण आता पुन्हा झाडांची कत्तल करून विकासाच्या नावाखाली कंत्राटदारांचा विकास सुरू आहे.” संजय गांधी नॅशनल पार्कलाही ‘बोडखं’ करण्याचे डावपेच सुरू असून त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे तपोवनचा नाश असल्याचे ठाकरे म्हणाले.
तपोवनची झाडं आणि हिंदुत्वाचे ‘थोतांड’
तपोवनातील साधुग्राम प्रकल्पावर ते म्हणाले की, “साधुग्रामाला आमचा विरोध नाही. पण तपोवनातील हजारो झाडांची कत्तल करून पवित्र परिसर उद्ध्वस्त करण्याला मात्र आमचा ठाम आक्षेप आहे. आधी झाडं कापा आणि मग पुन्हा लावू, अशी लोणकडी थाप मारली जाते. हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे.” “म्हणूनच आम्ही म्हणतो, भाजपचं हिंदुत्व हे थोतांड आहे. तोंडात राम आणि बगलमध्ये अदानी हा त्यांचा खरा चेहरा आहे.” असे ते म्हणाले. तपोवन प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जागा असून अशा पवित्र स्थळाचा विनाश करून सरकार पुण्य पदरात पाडून घेण्याचा ‘केविलवाणा प्रयत्न’ करत आहे, अशी त्यांनी टीका केली.
इतर महत्वाच्या बातम्या