मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा गंभीर आरोप अशोक चव्हाण यांनी केला. काँग्रेसच्या काही नेत्यांना मुख्यमंत्री आणि काँग्रेस सोडून गेलेले नेते फोन करुन भाजपमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचं चव्हाण म्हणाले. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील लवकरच भाजपमध्ये दाखल होत आहेत. तसंच काही काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी हा आरोप केल्याचं म्हटलं जातं.
काँग्रेस नेतेच भाजपला फोन करत आहेत : गिरीश महाजन
विधानसभेच्या तयारीसंदर्भात काँग्रेसची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस पदाधिकारी आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल नाराजीचा सूर आळवला. ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला तिथल्या जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिल्याची माहितीही चव्हाण यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम असून लोकसभेत अनेक मतदारसंघात अपेक्षित मदत मिळाली नसल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली. राष्ट्रवादीऐवजी वंचित आघाडीशी हातमिळवणी केल्यास काँग्रेसला जास्त फायदा होईल, असा सूरही काँग्रेस नेत्यांकडून ऐकायला मिळाला.
महाराष्ट्रात काँग्रेसची पुरती वाताहात झाली आहे. राज्यात काँग्रेसला फक्त एकच खासदार निवडून आला. अशा परिस्थितीत काँग्रेसला भरवशाच्या आणि मतांची बिदागी मिळवून देणाऱ्या साथीदाराची साथ हवी आहे. काँग्रेसला वंचित आघाडीमध्ये त्या साथीदाराचा चेहरा दिसत आहे.
लोकसभेत वंचित आघाडीने 41 लाख मतं खेचल्यामुळे आघाडीच्या नऊ उमेदवारांचा पराभव झाला होता. तसंच लोकसभेआधी आघाडी करण्यास प्रकाश आंबेडकरांनी नकार दिला होता. मात्र काँग्रेस हव्या तेवढ्या जागा सोडण्यास तयार झाल्यास प्रकाश आंबेडकर त्यांना टाळी देणार का याकडे देखील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
काँग्रेसने हातावरचं घड्याळ बाजुला काढून वंचितशी हातमिळवणी केली, तर राष्ट्रवादी काय भूमिका घेणार यावर देखील विधानसभेतल्या लढतीचं चित्र अवलंबून असणार आहे. राज ठाकरेंच्या मनसेसोबत विधानसभा लढण्याचा एक विकल्प शरद पवारांसमोर असणारच आहे
भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्बत झालंय, फक्त जागांची अधिकृत घोषणा व्हायची बाकी आहे. अशात काँग्रेस आणि वंचितने नवीन आघाडी जन्माला घातली आणि मनसेने राष्ट्रवादीशी घरोबा केला तर विधानसभेत तिहेरी लढत पाहायला मिळेल.