Ashish Shelar on congress bharat jodo yatra : भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला. शेलार यांनी म्हटलं की, महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) आज ज्या टप्प्यावर आहे ते पाहता यात राज्याला स्थैर्य देऊन सरकार चाललं पाहिजे आणि राज्याचं भलं झालं पाहिजे. यासाठी भाजप खूप सजग आहे आणि यासाठी नेतृत्व करायला भाजप तयार आहे. काँग्रेसचं भारत जोडोचा पहिला टप्पा नांदेडपासून सुरु होतोय. दुसरा टप्पाही सुरु होणार आहे. दुसऱ्या टप्प्यापर्यंत त्यांचे दोन टप्पे पडलेले दिसतील. पहिल्या टप्प्यात जे उर्ध्वयू म्हणून नेतृत्व करत आहेत ते दुसऱ्या टप्प्यात त्यातलेच दुसऱ्या टप्प्यात कुठल्या टापूवर बसलेले दिसतील हे महाराष्ट्राला दिसेल. उखाण्याने नावं घेण्याची वेळ नाही, असंही ते म्हणाले. 


काँग्रेसमधील नेतृत्वातील अस्वस्थता व्हिसीबल आहे. सत्ता गेल्यानंतरची बैचेनी महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आहे. ही बैचेनी लपून राहिलेली नाही. तिथल्या काही लोकांचा भाजप नेतृत्वाशी संवादाच्या बातम्या आलेल्या आहेत. योग्य वेळी योग्य करेक्ट कार्यक्रम होईल, असा दावा देखील शेलारांनी म्हटलं.


शेलार यांनी म्हटलं की, काँग्रेस तोडो हे अभियान भाजपचं नाही. काँग्रेसचं भारत जोडो हे काँग्रेस एकत्र करण्याचा प्रयत्न आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस एकसंघ नाही. नाना पटोलेंसारख्या बालिश नेतृत्वावर पृथ्वीराज चव्हाण खूश आहेत का? नसीम खान यांची परिस्थिती काय आहे? यात्रेत नितीन राऊतांना धक्काबुक्की कशी होते? याबाबत मी भाष्य करणार नाही. काँग्रेस ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर आहे. योग्य टप्प्यात योग्य कार्यक्रम होईल. अमित शाहांच्या संपर्कात काँग्रेसचेच नेते आहेत असं नाही राष्ट्रवादीचेही नेते असू शकतात, असं शेलार म्हणाले. 


सगळे पक्ष राज्याच्या भल्यासाठी एकत्र येऊन विचार करतील तर त्याचं कौतुक व्हायला हवं. हे जर खेळाच्या मैदानापासून सुरु होणार असेल तर ते स्वागतार्ह आहे. बऱ्याच गोष्टी पडद्याआड घडत असतात, असं देखील ते म्हणाले. राजकारणाच्या चर्चा आमच्या झाल्या आहेतच. पण यातून काही कटकारस्थान वगेरे आहे असं नाही. दोन राजकारणी भेटले की, एकमेकांबद्दल आकर्षण वाढतं, असं देखील ते म्हणाले. 


शेलार यांनी म्हटलं की, स्वत:चे मंत्री, आमदार, सदस्य त्यांची सत्ता असताना गेले. सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे होत्या, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तरी ते गेले. मतदानही त्यांनी विरोधात केलं, तुमच्याशी ते बोलले सुद्धा. त्यांच्या आरोप आहे की, शिवसेना दुबळी केली जातेय, बाळासाहेबांच्या विचारांपासून भरकटतेय, राष्ट्रवादी आमच्याशी राजकारण करतेय. या सर्व प्रश्नांना बगल द्यायची आणि भावनात्मक मुद्द्यांवर उरलेल्या शिवसैनिकांना टिकवण्यासाठी गद्दारीचं गाजर द्यायचं, असा टोलाही त्यांनी लगावला. 


ही बातमी देखील वाचा


'MCA निवडणुकीवेळी पडद्यामागे काही घडलंच नाही असं नाही, नवीन वर्षात फटाके फोडूयात', आशिष शेलारांचं सूचक वक्तव्य