मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक उलथापालथी सुरू आहेत, अनेक गौप्यस्फोट सुरू आहेत. असाच आणखी एक गौप्यस्फोट भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. 2017 सालीच भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत चर्चा झाली होती असं खळबळजनक वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं आहे. दैनिक लोकसत्तातर्फे आयोजित 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. 


देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी सकाळचा शपथविधी होण्यापूर्वी दोन वर्षे आधीच, 2017 साली राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युतीची चर्चा झाली होती अशी माहिती आमदार आशिष शेलार यांनी दिली. आशिष शेलार म्हणाले की, "भाजपला 2017 सालीच राष्ट्रवादीसोबत युती करावी असं वाटत होतं. शिवसेनेची रोजची धमकी, राजीनामा खिशात घालून फिरत असल्याची वक्तव्यं, यामुळे राष्ट्रवादीसोबत युती करावी अशी भूमिका भाजपने घेतली होती. यावेळी 2017 राष्ट्रवादीने आणि भाजपने एकत्रित यावं आणि सत्ता स्थापन करावी अशी चर्चा झाली होती. भाजपच्या नेतृत्वाने नंतर भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी असं तीन पक्षांचं सरकार स्थापन करु अशी भूमिका घेतली. पण नंतर राष्ट्रवादीने याला नकार दिला."


आशिष शेलार म्हणाले की, "यावेळी तीन पक्षांच्या सरकारला राष्ट्रवादीने विरोध केला. आपलं आणि शिवसेनेचं कधीच जमणार नाही असं राष्ट्रवादीनं सांगितलं. राष्ट्रवादी भाजपसोबत येत असताना भाजपने मात्र शिवसेनेला सोडण्यास नकार दिला. पण 2019 साली सत्ता दिसताच शिवसेनेने भाजपला सोडायची भूमिका सहज घेतली."


दरम्यान, आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, "राष्ट्रवादीनं ज्या शिवसेनेसोबत जमूच शकत नाही असं तेव्हा म्हटलं, त्यांनी आता शिवसेनेशी अशी सलगी केली की जत्रेतले दोन भाऊ हरवले होते असं वाटावं. शिवसेना आणि राष्ट्रवादीची भूमिका किती महिन्यात किती वर्षात बदलते याची साक्षीदार भाजपा आहे".