मुंबई: देशातील निर्माण झालेल्या धार्मिक तणावावरुन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. दिल्लीतील हिंसेवर चिंता व्यक्त करत महाराष्ट्रातही दिल्लीप्रमाणे वातावरण बिघडवण्याचं आणि समाजाला भडकवण्याचं काम सुरु असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मुंबईत राष्ट्रवादीतर्फे इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.


शरद पवार म्हणाले, "कोरोनाची परिस्थिती होती म्हणून आपल्याला मागच्या वर्षांत इफ्तार पार्टी साजरी करतां आली नाही. मागच्या आणि आजच्या परिस्थितीत फरक आहे. आज देशात खासकरून राज्यात आणि दिल्लीत एक प्रकारचा माहोल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत जे झालं ते चांगल झालं नाही. दिल्लीत हल्ले झाले, घरे देखील पाडण्यात आली. अशीच परिस्थिती आपल्या राज्यांत तयार करण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. लोकांच्यात, समाजात भांडणे लावणे हे योग्य नाही. पोलिसांच्या विरोधात आरोप केले जातात. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु आहे. "


राज्यात आणि दिल्लीत एकाच प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका शरद पवारांनी केली. दिल्लीत हिंसाचार घडवला जातोय. तसंच वातावरण महाराष्ट्रातही निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असं पवार म्हणाले. तर दुसरीकडे आज पुन्हा पवारांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. लोकांना बोलवून आपसातला एकोपा संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही, असं पवार म्हणाले.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी त्यांनी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिला आहे. तसं न केल्यास मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालिसा लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या मुद्द्यावरून राजकारण तापलं असताना दुसरीकडे राणा दाम्पत्यांच्या हनुमान चालिसा प्रकरणाची भर पडली. त्यामुळे राज्यातील सध्याचं वातावरण  चांगलंच तापल्याचं चित्र आहे.