नाशिक : दिंडीतील पहिला वैष्णवांचा रिंगण सोहळा सिन्नर येथील दातली शिवारात नेत्रदीपक उत्साहात पार पडला. पंढरपूरच्या विठू माऊलीची आस लागलेल्या वारकर्‍यांनी पावसाची तमा न बाळगता दातली येथील शेत शिवारात  वैष्णवांचा रिंगण सोहळा झाला.


 त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे निघालेल्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडीचा पाचवा दिवस दरवर्षीप्रमाणे सिन्नर तालुक्यातील दातलीच्या वैष्णव भूमीत रंगला. दरम्यान सिन्नरहून संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आज दातलीत येऊन पोहोचला. याठिकाणी गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यांनतर वारकऱ्यांचा शिस्तबद्ध आणि नयनरम्य असा रिंगण सोहळा वारकऱ्यांसह ग्रामस्थांनी अनुभवला. 


दरम्यान रिंगण सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी जिल्ह्यातून भाविकांनी गर्दी केली. रिंगण सोहळ्यासाठी हजारो वारकर्‍यांच्या उपस्थित दातली ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. दातलीकरांनी रांगोळी काढून फुलांचा सडा टाकला. हातात भगवा पताका घेऊन माऊली तुळशी वृंदावन डोक्यावर घेत हा सोहळा डोळ्यात टिपण्यासाठी आतूर दिसत होत्या. यावेळी रिंगण सोहळ्यातील वायुवेगाने  धावणारे अश्वमेध, टाळ-मृदुंगाच्या भक्ती सागरात तल्लीन झालेले वारकरी, माऊलीचा जयघोष हे सर्व डोळ्यात साठवून ठेवणारे चित्र विलोभनीय होते.


या रिंगण सोहळ्यात देव रिंगण, टाळकरी रिंगण, विणेकरी रिंगण झाले. हा रिंगण सोहळा डोळ्यात साठवून ठेवत माऊलीचे जमिनीवर हात लावत दर्शन घेतले. माऊलीच्या जयघोषात तुळशीवृंदावन डोक्यावर घेत वारकरी माउलींनी रिंगण भोवती फेरा लगावला. सोहळ्यानंतर महाआरती करण्यात आली. यानंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती.  


अद्भुत रिंगण सोहळा


सर्व वारकरी, झेंडेकरी, टाळकरी, विणेकरी, मृदुंगवादक गोलाकार उभे राहतात. माऊली माऊली म्हणत हरिनामाचा गजर सुरू होतो. टाळ मृदुंगाच्या एकाच तालात आणि एकाच लयीत वारकरी नाचू लागतात. यानंतर दिंडीतील अश्व गोलाकार फिरत पालखीला प्रदक्षिणा मारतात. अशा पद्धतीने हा रिंगण सोहळा पार पडतो. रिंगण होताच आट्यापिट्या, एकीबेकी यासोबतच महिलांच्या फुगड्या खेळल्या जातात. 


पोलिसही भक्तिरसात तल्लीन


दातली येथील रिंगण सोहळ्यानिमित्त परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्याचबरोबर अनेक पोलिसांनी रिंगणाच्या भजनात तल्लीन होत वारकऱ्यांसोबत आंनद लुटला. या सोहळ्यानिमित्ताने दातली गावातील वातावरण हे भक्तीमय झाले होते, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


खंबाळेत पुढील मुक्काम


दरम्यान दातलीतील रिंगण सोहळा पार पडल्यानंतर संत निवृत्तीनाथ दिंडी पालखी पुढील पायी सोहळ्यासाठी मार्गस्थ झाली. कोरोनामुळे दोन वर्षानंतर हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून आजचा दिंडीचा मुक्काम सिन्नरजवळ खंबाळे गावात असणार आहे.