Sharad Pawar in Ahmednagar : विकासाच्या कामामध्ये सर्वांनी एकत्र आलं आलं पाहिजे. मी राजकारण करतो, मात्र सामान्य माणसाच्या भल्यासाठी राजकारण करू, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगरमध्ये केलं. अहमदनगरमधील श्रीगोंदा येथे शिवाजीराव नागवडे पूर्णाकृती पुतळा अनावरण समारंभाचा कार्यक्रम पार पडला. या समारंभाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह बाळासाहेब थोरात, पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, भाजप नेते हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. शनिवारी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरवात झाली. 


यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, श्रीगोंदा येथील तत्त्वनिष्ठ व संयत नेतृत्व माजी आमदार स्व. शिवाजीराव नागवडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करताना समाधान वाटले. पुतळा अगदी हुबेहूब शिवाजीबापूंसारखा आहे. शिल्पकाराचे मनापासून कौतुक! शिवाजीराव बापूंनी सहकारी तत्वावर श्रीगोंदा साखर कारखाना उभा केला आणि पारंपरिक दुष्काळी भागाच्या विकासाला मोठा हातभर लावला. साखर कारखान्यानी आता साखरेसह इथेनॉल निर्माण करण्यासाठी प्राधान्य देणे गरजेचं आहे. कारखानदारी चालवायची म्हटल्यावर वाद विवाद असतात. पण वाद न करता यावर अनेक संसार उभे असल्याने बसून मार्ग काढणे गरजेचं आहे. विकासाच्या कामामध्ये सर्वांनी एकत्र आलं आलं पाहिजे. मी राजकारण करतो, मात्र सामान्य माणसाच्या भल्यासाठी राजकारण करू.  1978 साली मी मुख्यमंत्री झालो तेव्हा शिवाजीबापूंनी मला साथ दिली. आपल्या भागातील शेतकऱ्यांचे संसार सुधारले पाहिजेत, त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे, ही शिवाजीरावांची प्रामाणिक भूमिका होती. या परिसराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरिता पुढील पिढ्या कायम त्यांचे स्मरण करतील. 


बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
अहमदनगर जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याला संभाळणायच काम एका पिढीने केले. शंकरराव काळे, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब थोरात आणि बापू नागवडे यांनी जिल्हा सांभाळला. अनेक जिल्ह्यात सहकार मोडकळीस आलाय मात्र नगर जिल्ह्यात या पिढीने  सहकार जपला व वाढवला. राज्यात ही एका पिढीने नेतृत्व केलं. काही लोक चांगलं कसं मोडायच हे पाहतात. मात्र या मंडळींनी अडचणीत असणाऱ्यांना मदत करणारी ही पिढी आहे. श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक नेते व सर्वाधिक कार्यकर्ते आहेत. असं असलं तरी हे व्यासपीठावर वेगळे असले तरी लग्नात शेजारी बसतील अस हा तालुका आहे. 
हर्षवर्धन पाटील यांना चिमटा –
यावेळी भाषण करताना बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांच्याकडे पाहून चिमटे काढले. ते म्हणाले की, ‘बापुंनी (स्व. शिवाजीराव नागवडे) कायम काँग्रेसचे विचार जपले.आता राजेंद्र ही तेच करेल. मात्र मधल्या काळात काही मित्रांच्या सोबतीमुळे गडबड झाली होती. अशा परिस्थितीत ही अनुराधा ताई खंबीर राहिल्या. त्यामुळे सुबह का भुला श्यामको घर आया असं आम्ही मानतो.’ बाळासाहेब थोरातांच्या या वक्तव्यानंतर व्यासपीठावर सर्व पक्षीय नेत्यांचा हशा पिकला. 
दोषींवर कठोर कारवाई होणार -
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीचा तपास करण्यासाठी आठ जणांची समिती नेमली आहे. दोषींवर कठोर कारवाई होणार, असल्याचं अहमदनरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितलं. यावेळी पुढे बोलताना मुश्रीफांनी कोरोना वाढतोय, काळजी करा, असं आवाहन केलं. विदेशात पुन्हा कोरोना वाढतोय. आपण मात्र काळजी घेताना दिसत नाही. कारखान्याला विंनती करतो दोन्ही डोस घेतले असतील तर ऊस घ्यावा, असं मुश्रीफ म्हणाले. 
पोट निवडणुकीत पराभव झाल्याने इंधन दर कमी केले –
पोट निवडणुकीत दारुण पराभव झाल्याने केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात केली आहे. पूर्वी डिझेल-पेट्रोल दरांमध्ये मोठी तफावत होती. आता ते सारखच झालं आहे. दर वाढल्याने सगळी महागाई वाढत आहे. पवार साहेबांच्या काळात सर्वात जास्त वाहन विक्री झाली होती, कारण ग्रामीण भागात पैसा आल्याने हे शक्य झालं होतं. शेतकरी टिकला तर देश टिकेल, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील म्हणाले.