कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुका हा निसर्गाच्या संपदेनं नटलेला आहे. निसर्गाची विविध रुप या तालुक्यात पाहायला मिळतात. मात्र राधानगरी तालुक्यात घडलं त्यानं अंगावर काटा उभा राहिला. झालं असं की काल राधानगरी शहराच्या मुख्य बाजारपेठेतील वानराच्या कळपात कुणीतरी धारदार बाण मारला. तो बाण थेट एका वानराच्या छातीत आरपार घुसला. रक्ताळलेलं वानर छातीत घुसलेला बाण तसाच घेऊन जीव वाजवण्यासाठी या झाडावरुन त्या झाडावर उड्या मारत होतं. स्थानिकांनी अनेक प्रयत्न केले पण वानर कुणाला सापडलं नाही.
बायसन नेचर ग्रुपच्या सम्राट केरकर यांनी वन विभागाशी संपर्क साधला. अनेक प्रयत्न केले पण हे वानर काय सापडतं नव्हते. .इतका धारदार बाण या वानराला कुणी मारला? का मारला? याची माहिती अद्याप मिळालेली नाही. पण त्या वानराची अवस्था पाहून अनेकांना गहिवरुन आलं. स्थानिक वन विभागाला देखील ते वानर सापडत नव्हतं. जखमी झालेल्या वानराची जगण्यासाठी धडपड त्याच्या पद्धतीनं सुरु होती. पण त्याची जखम खोल होती. त्याच्यावर उपचार होणे गरजेचं होतं. पण काही केल्या वानर सापडेना.
कोल्हापुरातून शेवटी वन विभागाची रेस्क्यू टीम बोलवण्य़ात आली. रात्री उशिरा या वानराला पकडण्यात आलं. पण अजून पूर्ण यश आलं नव्हतं. प्राथमिक उपचार सुरु केले. छातीत आरपार घुसलेला बाण काढला. उपचारासाठी कोल्हापूरला आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. पण त्याच वेळी घायाळ झालेल्या त्या वानराने आपला प्राण सोडला. साधारण चार ते पाच तास केलेले प्रयत्न अखेर अयशस्वी ठरले. आणि उपस्थितांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. वन विभागानं आता बाण मारणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे.
राधानगरी तालुक्यातील निसर्गाच अद्भुत रुप जगासमोर आणण्यासाठी बायसन नेचर क्लब नेहमी प्रयत्न करत असतो. पण या घटनेनं सगळ्यांना खूप दु:ख झालं आहे. एकीकडे राधानगरी तालुका पर्यटनासाठी चांगला पर्याय असता ही घटना मनाला चटका लावणारी आहे. ज्यांनी वानरावर हल्ला केला आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी आमची मागणी आहे, असं बायसन नेचर क्लब, राधानगरीचे सम्राट केरकर यांनी म्हटलं आहे.