सोलापूर : न्यायालयाच्या तारखेला हजर न राहिल्याने सोलापूरमधील काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना जिल्हा न्यायालयातर्फे जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली 2 जानेवारी 2018 रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठक सुरु असताना एकीकडे आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासकीय रुग्णालयातील प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात आलं. याचवेळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला असता कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करत हुज्जत घातली होती. यामध्ये पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह नऊ जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात पोलिसांनी दोषारोप पत्रसुद्धा दाखल केले होते. वेळोवेळी सुनावणीची तारीख देऊनही सतत गैरहजर राहिल्याने आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट काढलं आहे. मात्र याप्रकरणी न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले आणि अन्य सहा जणांनी न्यायालयात सांगितलेल्या तारखेला हजेरी लावली होती. त्यांना न्यायालयातर्फे 29 ऑगस्टपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे.